न्यूयॉर्क – ‘जगातील काही देश अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी देत आहेत. माझ्या कारकिर्दीत अशी घटना कधीच घडली नव्हती. बायडेन प्रशासनाच्या धोरणांमुळे जगाला आण्विक महायुद्धाचा धोका आहे. हा धोका आपल्यापासून फार लांब राहिलेला नाही, हे लक्षात घ्या’, असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कमधील स्थानिक न्यायालयाने ट्रम्प यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. यासंदर्भातील पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी ट्रम्प यांनी मंगळवारी न्यूयॉर्कला भेट दिली. या भेटीनंतर केलेल्या वक्तव्यात त्यांनी बायडेन प्रशासनाविरोधात जोरदार टीकास्त्र सोडले.
डोनाल्ड ट्रम्प यांचे २००६ साली आपल्याबरोबर अफेअर होते, असा दावा अमेरिकेतील एका मॉडेलने केला होता. याप्रकरणी संबंधित मॉडेलने कुठेही वाच्यता करु नये यासाठी ट्रम्प यांचे माजी वकील मायकल कोहेन यांच्यामार्फत एक लाख तीस हजार डॉलर्स देण्यात आले. २०१९ साली झालेल्या चौकशीत कोहेन यांनी ही बाब मान्य केली होती. मॉडेलला दिलेले पैसे निवडणूक प्रचारासाठी वापरलेला निधी म्हणून दाखविण्यात आले. याप्रकरणी न्यूयॉर्कच्या ‘मॅनहटन डिस्ट्रिक्ट ॲटर्नी’च्या कार्यालयाने तपास करून ट्रम्प यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर (विद्यमान अथवा माजी) गुन्हा दाखल होण्याची इतिहासातील ही पहिलीच घटना ठरते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी ट्रम्प यांना न्यूयॉर्कमधील न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, ट्रम्प यांनी मंगळवारी न्यायालयात हजर राहिले. यावेळी ट्रम्प व त्यांच्या कायदेशीर सल्लागारांच्या उपस्थितीत माजी राष्ट्राध्यक्षांवर ठेवलेल्या आरोपांची माहिती देण्यात आली. त्याचवेळी ट्रम्प यांची आरोपी म्हणून नोंद करून त्यांच्या हाताचे ठसेही घेण्यात आले.
न्यायालयातील कारवाईदरम्यान ट्रम्प यांच्या वकिलांनी, ट्रम्प यांना आरोप अमान्य असल्याचा दावा केला. पुढील प्रक्रियेसाठी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना डिसेंबर महिन्यात पुन्हा न्यायालयात उपस्थित रहावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रक्रियेनंतर फ्लोरिडा प्रांतातील आपल्या निवासस्थानी परतलेल्या ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले. आपल्याविरोधात खोटी केस दाखल करण्यात आली असून हा २०२४ सालच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याच्या डेमोक्रॅट पक्षाच्या कटाचा भाग आहे, असा आरोप माजी राष्ट्राध्यक्षांनी केला.
‘अमेरिकेत असे कधी घडेल, याचा विचारही आपण केला नव्हता. अमेरिका नष्ट करण्याची योजना आखलेल्या गटांची भीती न बाळगता देशाच्या बचावासाठी प्रयत्न करणे हाच आपला एकमेव गुन्हा आहे’, असे भावनिक आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेनचा उल्लेख करीत त्याच्या लॅपटॉपमध्ये मिळालेल्या माहितीने बायडेन कुटुंबिय गुन्हेगार असल्याचे उघड केल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्था, सीमासुरक्षा यासारख्या मुद्यांवरून बायडेन यांच्या कारभारावर जोरदार कोरडे ओढले.
दरम्यान, रिपब्लिकन पक्षातील नेते व ट्रम्प समर्थकांनी मंगळवारी झालेल्या कायदेशीर कारवाईचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. ट्रम्प यांच्यावर आरोपपत्र दाखल करणारे ॲटर्नी उद्योजक जॉर्ज सोरोस यांच्या समर्थनावर निवडून आल्याकडे रिपब्लिकन नेते व संसद सदस्यांनी लक्ष वेधले. माजी राष्ट्राध्यक्षांवर झालेली कारवाई हे अमेरिकेतील न्यायव्यवस्थेचे ‘वेपनायझेशन’ असल्याचा आरोपही रिपब्लिकन नेत्यांनी यावेळी केला. ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांनंतर त्यांना अमेरिकी जनतेतून मिळणाऱ्या प्रतिसादात अधिकच वाढ झाल्याचा दावा प्रसारमाध्यमे व विश्लेषकांनी केला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |