मॉस्को – अमेरिकेने युरोपातील लष्करी तळांवरील अण्वस्त्रांची तैनाती वाढविल्यास रशिया त्याला चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या प्रवक्त्यांनी दिला. यावेळी पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी बेलारुसमधील रशियन अण्वस्त्र तैनातीचे समर्थन करून रशिया बेलारुसला एकटा पडू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील दिली. बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को रशियाच्या दौऱ्यावर असून या पार्श्वभूमीवर पेस्कोव्ह यांनी अण्वस्त्र तैनातीबाबत केलेली वक्तव्ये लक्ष वेधून घेणारी ठरतात.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह रशियाच्या वरिष्ठ नेत्यांनी रशियाच्या अण्वस्त्रसज्जतेचा वारंवार उल्लेख केला होता. रशियाला पराभूत करण्याच्या योजना आखणाऱ्यांनी हा अण्वस्त्रसज्ज देश आहे, हे विसरू नये असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी उघडपणे बजावले होते. तर रशियाच्या काही नेत्यांसह लष्करी अधिकाऱ्यांनी रशियाने युक्रेनमध्ये ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’चा वापर करावा, अशी आग्रही मागणीही केली होती. युक्रेनबरोबरील संघर्ष सुरू असतानाच रशियाने दोनदा प्रगत अण्वस्त्रांच्या चाचण्या घेतल्या होत्या. आपल्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ना अलर्टवर राहण्याचे आदेशही रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिले होते.
रशियन राजवटीच्या या आक्रमक भूमिकेनंतरही रशियाच्या ‘न्यूक्लिअर पोश्चर’मध्ये बदल झाल्याचे दिसले नसल्याचे अमेरिका व नाटोकडून सांगण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी अमेरिकेने नाटोच्या सहाय्याने युरोपातील अण्वस्त्र तैनातीत सुधारणा करण्याचा व नवी अण्वस्त्रे तसेच अणुबॉम्ब तैनात करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. युरोपिय देशांना अण्वस्त्रांचा मारा करता येतील, अशी लढाऊ विमाने व इतर यंत्रणा पुरविण्यात येत आहेत. नाटोत नव्याने सामील झालेल्या फिनलँडसह पूर्व युरोपातील देशांमध्ये अण्वस्त्रांच्या तैनातीबाबत चाचपणीही सुरू आहे.
अमेरिका व नाटोच्या या हालचालींची रशियाने गंभीर दखल घेतली आहे. रशियाने शेजारी देश असलेल्या बेलारुसबरोबरील संरक्षण सहकार्य वाढविण्यास वेग दिला आहे. युक्रेनबरोबरील संघर्ष सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेलारुसचा दौरा केला होता. दोन देशांमध्ये संरक्षण सहकार्य वाढविण्याबाबत करारही झाले होते. त्यात रशियन संरक्षणदलांसह क्षेपणास्त्रे तसेच हवाईसुरक्षायंत्रणेच्या तैनातीचीही तरतूद होती. करारानुसार, रशियाने जवळपास १० हजार जवान बेलारुसमध्ये तैनात केले आहेत. त्याचवेळी ‘एस-४०० डिफेन्स सिस्टिम’ व इस्कंदर क्षेपणास्त्रेही बेलारुसमध्ये तैनात करण्यात आली.
त्यापाठोपाठ, येत्या काही महिन्यात रशिया आपले ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’ बेलारुसमध्ये तैनात करील, अशी घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी नुकतीच केली होती. रशियन अण्वस्त्र तैनातीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को रशियात दाखल झाले आहेत. यात अण्वस्त्रांच्या तैनातीबरोबरच बेलारुसला ‘सिक्युरिटी गॅरेंटी’ पुरविण्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, अमेरिका व नाटोने युक्रेनच्या मोहिमेसंदर्भात तयार केलेल्या काही योजना सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने याची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे निर्देश दिले आहेत. पेंटॅगॉनच्या डेप्युटी प्रेस सेक्रेटरी सब्रिना सिंग यांनी याची कबुली दिली असून संरक्षण विभाग त्यावर काम करीत असल्याचे सांगितले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |