रशियाचे युक्रेनवर घणाघाती क्षेपणास्त्र हल्ले

- ७०हून अधिक क्षेपणास्त्रे व ड्रोन्स डागली

क्षेपणास्त्र हल्ले

मॉस्को/किव्ह – युक्रेनी राजवट आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाविरोधात आक्रमक मोहीम राबवित असतानाच रशियाने युक्रेनला पुन्हा एकदा दणका दिला. बुधवारी रशियन फौजांनी राजधानी किव्हसह देशाच्या अनेक भागांमध्ये क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा वर्षाव केला. गेल्या १० दिवसांमध्ये रशियाने इतक्या मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविण्याची ही दुसरी वेळ आहे. या घणाघाती हल्ल्यांमधून रशियाने पुन्हा एकदा आपली संरक्षणक्षमता दाखवून दिली असून युक्रेनसह त्याला समर्थन देणाऱ्या देशांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. रशियाच्या या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनला ४० कोटी डॉलर्सच्या नव्या लष्करी सहाय्याची घोषणा केली.

क्षेपणास्त्र हल्ले

राजधानी किव्हनंतर खार्किव्ह व खेर्सनमधील रशियाची माघारी जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली होती. रशियाचे संरक्षणदलांकडे पुरेशी क्षमता नसल्याने रशिया एकापाठोपाठ एक माघारीचे निर्णय घेत असल्याचे दावे पाश्चिमात्यांकडून करण्यात येत होते. गेल्या महिन्यात रशियाने मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे सत्र सुरू केल्यानंतरही रशियाकडील क्षेपणास्त्रांचे साठे संपत चालल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण हे दावे व बातम्या खोट्या पाडत गेल्या काही दिवसात रशियाने आपली जबरदस्त संरक्षणक्षमता वारंवार दाखवून दिली आहे.

गेल्या मंगळवारी रशियन संरक्षणदलांनी युक्रेनची राजधानी किव्हसह देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्रांसह ड्रोन्सचा वर्षाव केला होता. यासाठी जवळपास १०० क्रूझ क्षेपणास्त्रे व आत्मघाती ड्रोन्सचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या आठ दिवसात जवळपास ७५ क्रूझ मिसाईल्स व ड्रोन्सचा मारा करून रशियाने युक्रेनला हादरा दिला. बुधवारी केलेल्या हल्ल्यांमध्ये वीजप्रकल्प, उपकेंद्रे व महत्त्वाच्या जागांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती रशियाने दिली आहे. यादरम्यान राजधानी किव्हसह लिव्ह, विनित्सिआ, झॅपोरिझिआ, ओडेसा, मायकोलेव्ह, खेर्सन, डिनिप्रोपेट्रोव्हस्क, सुमी व खार्किव्ह या प्रांतांवर हल्ले झाल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. रशियाच्या हल्ल्यांमुळे राजधानी किव्हसह अनेक प्रमुख शहरांमधील वीज तसेच पाणीपुरवठा बंद पडल्याचे युक्रेनी अधिकाऱ्यांनी सांगितले. युक्रेनचा शेजारी देश असणाऱ्या मोल्दोव्हालादेखील रशियन हल्ल्यांचा फटका बसला. रशियाच्या हल्ल्यांनंतर या देशातील जवळपास ५० टक्के वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मोल्दोव्हा सरकारकडून देण्यात आली. यानंतर मोल्दोव्हा सरकारने रशियन राजदूतांना समन्स धाडल्याचेही समोर आले आहे.

क्षेपणास्त्र हल्ले

रशियाच्या नव्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संरक्षण विभागाने युक्रेनसाठी ४० कोटी डॉलर्सच्या नव्या लष्करी सहाय्याची घोषणा केली. यात नॅसॅम्स यंत्रणेसाठी अतिरिक्त क्षेपणास्त्रे, हायमार्स यंत्रणेसाठी रॉकेट्स, हेवी मशिनगन्स, अँटी रेडिएशन मिसाईल्स, मॉर्टर्स यांचा समावेश आहे. या नव्या घोषणेनंतर अमेरिकेने युक्रेनला दिलेल्या शस्त्रसहाय्याचे मूल्य १९ अब्ज डॉलर्सवर गेले आहे. अमेरिकेच्या घोषणेपाठोपाठ ब्रिटनने युक्रेनला ‘सी किंग हेलिकॉप्टर्स दिल्याचेही जाहीर केले आहे.

दरम्यान, आखातातील ‘युएई’मध्ये रशिया व युक्रेनच्या अधिकाऱ्यांची गोपनीय बैठक पार पडल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. युद्धकैद्यांची अदलाबदल व अमोनियाची निर्यात या मुद्यांवर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. दोन दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अमोनियाच्या निर्यातीसाठी रशिया सकारात्मक पावले उचलत असल्याचे वक्तव्य केले होते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info