मॉस्को/वॉशिंग्टन – रशियाने युक्रेनच्या लष्कराची मोठी हानी घडविली असून लक्षावधी नागरिकांना निर्वासित बनवून देशाबाहेर धाडले आहे. युक्रेनमधील बराचसा भागही रशियन फौजांनी ताब्यात घेतला आहे. रशियाच्या युक्रेनमधील मोहिमेची उद्दिष्टे साध्य झाली असून रशियाच्या सत्ताधारी राजवटीने याची घोषणा करून युद्धाची अखेर करायला हवी, असा दावा ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख येव्गेनी प्रिगोझिन यांनी केला. ‘वॅग्नर ग्रुप’ ही रशियातील खाजगी लष्करी कंत्राटदार कंपनी असून प्रिगोझिन हे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या निकटवर्तियांमधील एक म्हणून ओळखण्यात येतात.
गेल्या महिन्याभरात रशियाने युक्रेनमधील आपल्या हल्ल्यांची तीव्रता अधिक वाढविल्याचे दिसत आहे. उत्तरेकडील खार्किव्ह प्रांतापासून ते दक्षिण युक्रेनमधील ओडेसा बंदरापर्यंतच्या क्षेत्रात सातत्याने हल्ले सुरू आहेत. लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, रणगाडे, तोफा, रॉकेटस्च्या सहाय्याने युक्रेनमधील शहरे तसेच लष्करी तळांवर प्रखर मारा सुरू आहे. बाखमतसारख्या शहरात रशियन फौजांनी 80 टक्क्यांहून अधिक भागावर ताबा मिळवित युक्रेनी लष्कराची कोंडी करण्यात यश मिळविले आहे.
रशियाच्या आक्रमक हल्ल्यांमुळे युक्रेनकडून रशियाविरोधात आखण्यात आलेली प्रतिहल्ल्यांची योजना लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येते. पाश्चिमात्य माध्यमे तसेच विश्लेषकांकडून रशिया व युक्रेन दोन्ही बाजूंची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे दावे करण्यात येत आहेत. प्रचंड हानीमुळे दोन्ही बाजू नजिकच्या काळात मोठ्या आक्रमणासाठी तयार नसल्याचेही म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर रशियाच्या ‘वॅग्नर ग्रुप’च्या प्रमुखांनी केलेला दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
पूर्व तसेच दक्षिण युक्रेनमधील लढाईत ‘वॅग्नर ग्रुप’च्या पथकांनी महत्त्वाचे योगदान दिल्याचे समोर आले होते. डोन्बासमधील सोलेदार तसेच बाखमतच्या लढाईत या गटाच्या पथकांनी केलेल्या संघर्षाचा पाश्चिमात्य देश तसेच युक्रेनच्या लष्कराकडूनही उल्लेख करण्यात आला होता. या दोन्ही लढायांमध्ये ‘वॅग्नर ग्रुप’चेही प्रचंड नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पुढील काळात रशियाच्या युक्रेन मोहिमेतील या गटाचा सहभाग घटलेला असेल, असे संकेत मिळत आहेत. ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख प्रिगोझिन व रशियन राजवटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.
दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकारी व्हिक्टोरिआ न्यूलँड यांनी, युक्रेनच्या पुनर्उभारणीसाठी रशियाचा निधी वापरण्यात येईल, असे वक्तव्य केले आहे. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यावर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले होते. त्यात रशियाच्या परकीय गंगाजळीचा भाग असलेला 300 अब्ज डॉलर्सहून अधिक निधी गोठविण्याच्या निर्णयाचाही समावेश होता. युक्रेन तसेच पोलंडने हा निधी युद्धानंतर युक्रेनच्या पुनर्उभारणीसाठी वापरावा, अशी मागणी केली होती.
अमेरिका व काही युरोपिय देशांमधून या मागणीला समर्थन मिळत असून न्यूलँड यांचे वक्तव्य त्याचाच भाग ठरतो. गेल्या आठवड्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी युक्रेनच्या पुनर्उभारणीसाठी 400 अब्ज डॉलर्सहून अधिक खर्व अपेक्षित असल्याचा दावा केला. या खर्चात रशियाही वाटा उचलेल, असे सांगून रशियाच्या गोठविलेल्या परकीय गंगाजळीचा वापर करण्याचे संकेत न्यूलँड यांनी दिले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |