ऑस्ट्रेलियात पंतप्रधान मॉरिसन यांच्या विजयाने चीनला धक्का

ऑस्ट्रेलियात पंतप्रधान मॉरिसन यांच्या विजयाने चीनला धक्का

कॅनबेरा – ऑस्ट्रेलियातील निवडणुकीत पंतप्रधान ‘स्कॉट मॉरिसन’ यांचा विजय झाला आहे. हा विजय म्हणजे राजकीय चमत्कार असल्याचा दावा केला जातो. या निवडणुकीत मॉरिसन यांचा पराभव निश्‍चित असल्याचे मानले जात होते. मात्र विश्‍लेषकांचे सारे अडाखे चुकवून मॉरिसन पुन्हा पंतप्रधानपदी आल्याचे दिसत आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी मॉरिसन यांच्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया व चीनचे संबंध अधिकच बिघडतील, अशी चिंता व्यक्त केली आहे.

स्कॉट मॉरिसन या निवडणुकीनंतर पंतप्रधानपदावरून खाली उतरतील, असा दावा बहुतांश विश्‍लेषक तसेच माध्यमांनी केला होता. हे सारे अंदाज चुकवून मॉरिसन पंतप्रधानपदावर आले असून त्यांचा लिबरल पक्ष आपल्या सहकारी पक्षांच्या बरोबरीने सरकार स्थापन करणार हे निश्‍चित झाले आहे. त्यांच्या विजयावर ऑस्ट्रेलियातील उदारमतवादी नाराज झाले असून नकारात्मक प्रचारमोहिमेमुळे हे यश मिळाल्याची टीका उदारमतवाद्यांकडून केली जात आहे.

याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे चीनकडून मॉरिसन यांच्या या विजयावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. चीनचे सरकारी वर्तमानपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने स्कॉट मॉरिसन यांचा विजय घातक असल्याचे सांगून यावर चीन चिंतित असल्याची प्रतिक्रिया दिली. गेल्या काही महिन्यांपासून चीन व ऑस्ट्रेलियामधील संबंध विकोपाला गेले आहेत. मॉरिसन यांच्या विजयामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिकच बिघडतील, अशी भीती ‘ग्लोबल टाईम्स’ने व्यक्त केली.

स्कॉट मॉरिसन यांच्या सरकारने चीनपासून ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेला धोका असल्याचे बजावून चीनच्या विरोधात कडक भूमिका स्वीकारली होती. चीनच्या ‘हुवेइ’ कंपनीवर मॉरिसन सरकारने बंदी टाकली होती. तसेच चीनला रोखणारे इतर महत्त्वाचे निर्णयही घोषित केले होते. तर मॉरिसन यांचे राजकीय विरोधक मात्र चीनबरोबरील संबंध सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे संकेत देत होते. चीनवर दोषारोप करणार्‍या ऑस्ट्रेलियन गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांना बडतर्फ करण्याची आवश्यकता असल्याचा दावा माजी पंतप्रधान पॉल कियाटिंग यांनी केला होता.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info