लंडन – भविष्यातील विविध धोक्यांचा मुकाबला व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रिटनचा प्रभाव वाढविण्यासाठी संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणाची आवश्यकता असल्याचा निर्धार व्यक्त करून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यासाठी तब्बल 32 अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणुकीची घोषणा केली. ही गुंतवणूक पुढील चार वर्षात करण्यात येणार असून त्यात ‘स्पेस कमांड’, ‘नॅशनल सायबर फोर्स’ व ‘लेझर वेपन्स’तसेच आर्टिफिशल इंटेलिजन्समधील गुंतवणुकीचा समावेश असेल, असे पंतप्रधान जॉन्सन म्हणाले. संरक्षणखर्चातील कपातीचे युग आता संपल्याचे सूचक उद्गार यावेळी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी काढले. शीतयुद्धानंतर पहिल्यांदाच ब्रिटनकडून संरक्षणक्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे.
‘गेली अनेक वर्षे ब्रिटीश सरकार संरक्षणखर्चाला सातत्याने कात्री लावत आले आहे. हे धोरण असेच पुढे चालू राहिले तर ब्रिटनची संरक्षणदले शत्रूपुढे टिकून राहण्याची किमान क्षमताही गमावून बसण्याची भीती आहे. जर ही क्षमता गमावली तर ती पुन्हा कधीच मिळविणे शक्य होणार नाही. ब्रिटीश जनतेची सुरक्षा संकटातही येऊ शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती व देशाचे परराष्ट्र धोरण यांच्या आधारावर संरक्षणखर्चातील कपातीचे युग संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील चार वर्षात ब्रिटनच्या संरक्षणखर्चात 24 अब्ज पौंडाहून अधिक वाढ करण्यात येत आहे’, अशा शब्दात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणाची घोषणा केली.
सध्या शीतयुद्धानंतरची सर्वात धोकादायक परिस्थिती असून प्रचंड स्पर्धा निर्माण झाली असल्याकडे पंतप्रधान जॉन्सन यांनी लक्ष वेधले. ब्रिटनसह जगातील प्रत्येक देशाचे दैनंदिन व्यवहार आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर अवलंबून असून त्याकडे दुर्लक्ष करून ती जबाबादारी इतर सहकारी देशांवर ढकलता येणार नाही, याची परखड जाणीव पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या संसदेला करून दिली. ब्रिटनचे हितसंबंध व मूल्ये जपणे आणि त्याचवेळी जागतिक स्तरावरील दबदबा कायम राखणेही महत्त्वाचे असल्याचे सांगून संरक्षणदलांचे आधुनिकीकरण हा त्याचा पाया ठरतो, या शब्दात त्यांनी वाढीव संरक्षणखर्चाचे समर्थन केले.
पूर्वी ब्रिटन जगातील सागरी लाटांवर हुकुमत गाजवित होता, याची आठवण करून देत पुढील काळात ब्रिटनला युरोपातील सर्वाधिक सामर्थ्यशाली नौदल बनविणे हे संरक्षणक्षेत्रातील गुंतवणुकीचे प्रमुख उद्दिष्ट असेल, असे ब्रिटीश पंतप्रधानांनी बजावले. 2023 सालापर्यंत ब्रिटनच्या दोन्ही विमानवाहू युद्धनौका कार्यरत झालेल्या असतील, असा दावा त्यांनी यावेळी केला. त्याचवेळी येत्या काही वर्षात ब्रिटनच्या नौदलात 13 विनाशिका, सपोर्ट शिप्स, ‘मल्टीरोल रिसर्च व्हेसल्स’ व आधुनिक युद्धनौकांचा समावेश करण्यात येईल, असेही पंतप्रधान जॉन्सन म्हणाले.
पुढील चार वर्षात ब्रिटन ‘स्पेस कमांड’, ‘नॅशनल सायबर फोर्स’ व ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स सेंटर’ सक्रिय करणार असून ब्रिटीश युद्धनौकांवर ‘लेझर वेपन्स’ तैनात करण्यात येतील, अशी ग्वाही जॉन्सन यांनी दिली. ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस एलिझाबेथ’ पुढील वर्षी हिंदी महासागर व पूर्व आशियाची महत्त्वाकांक्षी मोहीम पार पाडेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोनाची साथ फैलावत असतानाही देशाच्या सुरक्षेला दुय्यम स्थान देता येणार नाही हे लक्षात ठेऊन संरक्षणखर्चातील गुंतवणुकीचा निर्णय घेण्यात आल्याचे ब्रिटनच्या पंतप्रधानांनी अखेरीस बजावले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |