लंडन – लेबेनॉनच्या बैरूतमध्ये असलेले हिजबुल्लाहचे नेते आणि सदस्य आकाश आणि घड्याळावर नजर ठेवून आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्याच्या आधी अमेरिका-इस्रायल हे हल्ले याची खात्री हिजबुल्लाहला पटलेली आहे. म्हणूनच हल्ल्याच्या चिंतेने ग्रासलेले हिजबुल्लाहचे नेते व सदस्य आकाशावर आणि ट्रम्प यांचा कार्यकाळ कधी सरतो, याची प्रतिक्षा करीत घड्याळावर नजर ठेवून असल्याचे हिजबुल्लाहच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.
ब्रिटनच्या ‘गार्डियन’ नामक दैनिकाकडे हिजबुल्लाहच्या नेत्यांनी ही भीती व्यक्त केली आहे. ‘ज्यो बायडेन यांच्या शपथग्रहणासाठी चार आठवड्याहून कमी कालावधी शिल्लक आहे. बायडेन सत्तेवर आल्यानंतर ते इराणबरोबर अणुकरार करून इराणवरील निर्बंध मागे घेतील आणि त्यानंतर आमच्यावरील दबाव कमी होईल’, असे सांगून हिजबुल्लाहच्या नेत्याने अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराण व संलग्न संघटनांवर दबाव निर्माण झाला होता, याची कबुली दिली.
पण बायडेन सत्तेवर येईपर्यंत ट्रम्प प्रशासन आणि इस्रायल मिळून इराण व हिजबुल्लाहची फार मोठी हानी घडवून आणू शकतात, अशी चिंता हिजबुल्लाहच्या दोन वरिष्ठ कमांडर्सनी व्यक्त केली.
गेल्या महिन्याभरात इस्रायली लढाऊ विमानांच्या लेबेनॉनवरील, त्यातही राजधानी बैरूतवरील घिरट्या तीव्र झाल्या आहेत. यामुळे हिजबुल्लाहच्या तळांजवळील सुरक्षा वाढविण्यात आल्याचे हिजबुल्लाहच्या कमांडर्सनी गार्डियनला सांगितले. ‘ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडण्याआधी जे काही सुरू केले आहे, ते संपवायचे आहे’, असे सांगून एका हिजबुल्लाह कमांडरने या वर्षभरातील अमेरिका व इस्रायलच्या कारवाईकडे लक्ष वेधले.
या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने इराकमध्ये हल्ला चढवून इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख कासेम सुलेमानी तसेच इराकमधील इराणसंलग्न ‘कतैब हिजबुल्लाह’ या दहशतवादी संघटनेचे प्रमुख मोहानदिस यांना ड्रोन हल्ल्यात ठार केले होते. तर त्यानंतर इराणची राजधानी तेहरानजवळ अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची हत्या घडविली. आता अमेरिका आणि इस्रायल इराणसंलग्न हिजबुल्लाहप्रमुख हसन नसरल्ला यांना टार्गेट करू शकतात. पण नसरल्ला कडेकोट सुरक्षेत आहेत, अशी माहिती हिजबुल्लाहच्या कमांडरने दिली.
‘आम्ही मृत्यूला भीत नाही. पण आम्हाला आमच्या नेत्यांना अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवायचे आहे. कारण त्यांचे काही झाले तर आमचे मोठे नुकसान होईल. सध्याचा हा काळ अतिशय अवघड आहे. ट्रम्प हे वेडसर आहेत. त्यांच्याकडे संयम नाही आणि वेळही नाही. इस्रायलींना वाटत असेल की ते आम्हाला लक्ष्य करतील, पण त्याआधी आम्हीच त्यांना लक्ष करू’, असेही हिजबुल्लाह कमांडर्सनी या मुलाखतीत बजावले आहे.
नसरल्ला नक्की कुठे आहे, याची माहिती हिजबुल्लाहच्या कमांडर्सनी दिली नाही. पण फखरीझादेह यांच्या हत्येनंतर नसरल्ला यांना बैरूतमधील त्यांच्या ‘सेफ हाऊस’मधून काढून इराणच्या राजधानी तेहरानमध्ये हलविल्याचा दावा केला जातो. दरम्यान, गेल्या महिन्यात इराणमध्ये फखरीझादेह यांच्या हत्येनंतर हिजबुल्लाहने अमेरिका इस्रायलविरोधात चिथावणीखोर विधाने करण्याचे टाळले होते.
हिजबुल्लाहप्रमुख इस्रायलच्या हल्ल्याच्या भीतीने दडून बसल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. पण हिजबुल्लाहच्या कमांडर्सनी गार्डियनकडे केलेले दावे लक्षात घेता, इस्रायलच्या विरोधात मोठमोठे दावे ठोकणारी हिजबुल्लाह सध्या तरी इस्रायलच्या संभाव्य हल्ल्यापासून आपल्या नेत्यांचा बचाव करण्यात गुंतलेली असल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |