बीजिंग – नववर्षाच्या पूर्वसंध्येला अमेरिकेच्या दोन युद्धनौकांनी तैवानच्या आखातातून गस्त घातली. गेल्या वर्षभरातील अमेरिकेच्या युद्धनौकांची या सागरी क्षेत्रातील ही तेरावी गस्त ठरते. अमेरिकी युद्धनौकेच्या या गस्तीवर चीनकडून प्रतिक्रिया उमटली आहे. चीनचे लष्कर आपल्या सागरी क्षेत्रात निर्माण होणारे धोके आणि चिथावण्यांना उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. दोन दिवसांपूर्वीच चीनने तिबेटच्या मुद्यावरुनही अमेरिकेला धमकावले होते.
जपानच्या योकोसूका बंदरात तैनात असलेल्या अमेरिकेच्या सातव्या आरमारातील ‘युएसएस जॉन एस. मॅक्केन’ आणि ‘युएसएस कर्टीस विल्बर’ या दोन युद्धनौकांनी गुरुवारी संध्याकाळी तैवानच्या आखातातून प्रवास केला. क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेने सज्ज असलेल्या दोन विनाशिकांनी एकत्रितपणे या सागरी क्षेत्रातून प्रवास करण्याची ही वर्षातील पहिली वेळ होती. ‘स्वतंत्र आणि मुक्त इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी अमेरिका बांधिल असल्याचे प्रदर्शित करण्यासाठी ही सागरी गस्त महत्त्वाची होती. तसेच आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत राहून ही गस्त पूर्ण केली’, असे अमेरिकेच्या नौदलाने स्पष्ट केले.
पण नेहमीप्रमाणे अमेरिकी युद्धनौकांच्या या गस्तीवर चीनने संताप व्यक्त केला आहे. ‘अमेरिकी युद्धनौका या क्षेत्रात सामर्थ्यप्रदर्शन करुन चिथावणी देत आहेत. अमेरिकी युद्धनौकांची ही गस्त तैवानच्या स्वातंत्र्याची मागणी करणार्या गटांना चुकीचा संदेश देणारी आहेत. तसेच यामुळे या क्षेत्रातील शांती धोक्यात येऊ शकते’, असा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेंबिन यांनी केला. या सागरी क्षेत्रातील कुठल्याही चिथावणी आणि धोक्याला उत्तर देण्यासाठी चीनचे लष्कर सज्ज असल्याचेही वेंबिन यांनी बजावले.
तैवान हा आपलाच भूभाग असल्याचा दावा चीन करीत आहे. त्यामुळे जगातील कुठल्याही देशाने तैवानबरोबर राजकीय, लष्करी किंवा कुठल्याही प्रकारचे सहकार्य प्रस्थापित करू नये, असे इशारे चीनकडून सातत्याने दिले जातात. पण अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने चीनच्या या इशार्यांकडे दुर्लक्ष करून तैवानबरोबर लष्करी सहकार्य वाढविले आहे. त्याचबरोबर तैवानच्या सागरी हद्दीतून युद्धनौका रवाना करून अमेरिकेने आपण तैवानच्या सुरक्षेसाठी बांधिल असल्याचा संदेश चीनला दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेच्या ‘युएसएस मस्टिन’ या युद्धनौकेने या क्षेत्रातून प्रवास केला होता. त्यानंतर चीनने देखील आपली विमानवाहू युद्धनौका रवाना करून आपण अमेरिकेची पर्वा करीत नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला होता.
गेल्या काही महिन्यांपासून व्यापारयुद्ध, कोरोनाव्हायरस, तैवान, हाँगकाँग, साऊथ चायना सी तसेच तिबेटच्या मुद्यावरुन अमेरिका आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. या आठवड्यातच अमेरिकेने तिबेट आणि तैवानबाबत संमत केलेल्या कायद्यावरही चीनने आक्षेप घेतला होता. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने हाँगकाँगमधील १२ लोकशाहीसमर्थकांना अटक केली होती. त्यावर अमेरिकेने सडकून टीका केली होती.
दरम्यान, अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या कार्यकाळात चीनबरोबरचे संबंध पुन्हा सुधारतील, अशी अपेक्षा चीन व्यक्त करीत आहे. तर अमेरिकी माध्यमे बायडेन यांचे धोरण चीनधार्जिणे असेल, अशी शक्यता वर्तवित आहेत. मात्र, ट्रम्प यांनी चीनबाबत स्वीकारलेली धोरणे बायडेन यांनी अधिक आक्रमकपणे राबवावित, असे बायडेन यांचे सल्लागार आणि ‘सीआयए’चे माजी प्रमुख स्टॅन्ले मॅख्रिस्टल यांनी सुचविले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |