स्वीडन व फिनलँडला सदस्यत्व हा नाटोच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेचा भाग

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेचा भाग

मॉस्को/माद्रिद – स्वीडन व फिनलँडला नाटोकडून देण्यात येणारे सदस्यत्व हा नाटोच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेचा भाग ठरतो, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. त्याचवेळी युक्रेन युद्धाच्या माध्यमातून नाटो आपले वर्चस्व दाखवून देण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले. बुधवारी नाटोने स्वीडन व फिनलँडला सदस्य बनण्यासाठी आमंत्रण देत असल्याचे जाहीर केले होते. त्यावर रशियन राष्ट्राध्यक्षांकडून प्रतिक्रिया उमटली आहे.

स्वीडन व फिनलँड या दोन्ही देशांनी नाटोत सहभागी होण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी गेली सात दशके स्वीकारलेल्या अलिप्ततेच्या धोरणाला दोन्ही देशांनी सोडचिठ्ठी दिली. मात्र स्वीडन व फिनलँडच्या प्रवेशाला तुर्की या नाटो सदस्य देशाने विरोध दर्शविला होता. अमेरिका व नाटो नेतृत्त्वाच्या मध्यस्थीनंतर तुर्कीने हा विरोध मागे घेतला. मंगळवारी तुर्कीने स्वीडन व फिनलँडबरोबर करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यामुळे या दोन्ही देशांचा नाटोतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येते.

साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेचा भाग

या पार्श्वभूमीवर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘युक्रेनप्रमाणे स्वीडन व फिनलँडबरोबर रशियाचा कोणताही वाद नाही. या देशांना नाटोत जायचे असेल, तर ते पुढे जाऊ शकतात. आतापर्यंत रशियाला त्यांच्याकडून धोका नव्हता. पण नाटोने स्वीडन व फिनलँडमध्ये लष्करी तैनाती केल्यास धोका निर्माण होईल आणि या धोक्याला रशिया जशास तसे प्रत्युत्तर देईल’, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले. स्वीडन व फिनलँडला सदस्यत्व देणे ही बाब नाटोची साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा दाखवून देणारी असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला.

साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेचा भाग

स्वीडन व फिनलँड चे सदस्य झाल्यास या देशांचे रशियाबरोबरील संबंध बिघडू शकतात आणि ही गोष्ट या देशांनी लक्षात ठेवायला हवी, याकडेही पुतिन यांनी लक्ष वेधले. पुढील काळात रशिया व नाटोच्या नव्या सदस्य देशांमधील तणाव वाढू शकतो, असेही राष्ट्राध्यक्ष पुतिन यावेळी म्हणाले. पुतिन यांनी यापूर्वी फिनलँडला भयंकर परिणामांचा इशारा दिला होता. रशियाने फिनलँडचा इंधनपुरवठाही बंद केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून फिनलँडसह स्वीडनने नाटोत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात रशिया या देशांच्या आघाडीवर लष्करी तैनाती वाढवू शकते, असे संकेत मिळत आहेत.

नाटोचा विस्तार हा मुद्दा रशिया व पाश्चिमात्य देशांमधील संबंधांमध्ये सातत्याने तणावाचा मुद्दा राहिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या मुद्यावर कायम आक्रमक भूमिका घेऊन रशियाची संरक्षणसज्जता वाढविण्यावर भर दिला. त्याचवेळी नाटोने रशियाच्या प्रभावक्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न केल्यास संघर्षाचा इशाराही दिला होता. या मुद्यावर अणुयुद्धाचा भडका उडू शकतो, असेही रशियन नेतृत्त्वाने बजावले होते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info