इस्रायल-हमास संघर्षाचा वापर करून इराणने अमेरिकेला मुर्ख बनविले – अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांची टीका

इस्रायल-हमास संघर्षाचा वापर करून इराणने अमेरिकेला मुर्ख बनविले – अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांची टीका

इस्रायल-हमास

दोहा/तेहरान/वॉशिंग्टन – ‘इस्रायलबरोबरच्या संघर्षासाठी हमासला शस्त्रास्त्रे आणि आर्थिक सहाय्य पुरविल्याबद्दल आम्ही इराणचे आभारी आहोत’, असे हमासचा प्रमुख इस्माईल हनिया याने म्हटले आहे. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी देखील गाझातील पॅलेस्टिनींना लष्करी व आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी जगभरातील इस्लामी देशांना आवाहन केले. तर व्हिएन्ना येथील वाटाघाटींचे नाटक रचून इराणने हमासद्वारे इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविले. इराणच्या या डावात बायडेन प्रशासन मुर्ख बनल्याची जळजळीत टीका अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली आहे.

‘11 दिवसांच्या संघर्षानंतर हमासने इस्रायलवर जरब बसविणारा विजय मिळविला. यामुळे अरब देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्याचे इस्रायलची योजना उधळली गेली. या संघर्षाला अरब-आखाती देशांबरोबरच पाश्‍चिमात्य देशांमधून मिळालेले समर्थन आपण सर्वांनी पाहिले. हा इस्रायलवरील आपला सर्वात मोठा विजय असून याचा इस्रायलवर खोलवर परिणाम होईल’, असा दावा हमासचा प्रमुख हनियाने केला.

इस्रायल-हमास

गेली काही वर्षे कतारमध्ये आश्रय घेतलेल्या हमासच्या प्रमुखाने संघर्षबंदीसाठी मध्यस्थी करणार्‍या इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिरी यांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर अल-अक्सा प्रार्थनास्थळ स्वतंत्र होईपर्यंत इस्रायलविरोधातील हा संघर्ष सुरू राहील, अशी धमकी हमासच्या प्रमुखाने दिली. तर इस्रायलचबरोबरच्या या संघर्षासाठी हमासला रॉकेट पुरविणार्‍या इराणचे हनियाने जाहीर आभार मानले.

इराणचे सर्वोच्च धर्मगुरु आणि या देशाच्या राजकीय व्यवस्थेवर पकड असलेले सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी शुक्रवारच्या सभेत हमासने इस्रायलवर मिळविलेल्या विजयाचे स्वागत केले. ‘जगभरातील इस्लामी देशांनी प्रामाणिकपणे पॅलेस्टिनी जनतेच्या समर्थनार्थ लष्करी किंवा आर्थिक सहाय्य करावे किंवा गाझाच्या पुनर्बांधणीसाठी मदत करावी. याशिवाय आपल्या देशाच्या सरकारने पॅलेस्टिनींना समर्थन करावे, यासाठी तेथील इस्लामी जनतेने जोरदार मागणी करावी’, असे आवाहन खामेनी यांनी केले.

इस्रायल-हमास

हमासचे इस्रायलवरील हल्ले हा इराणच्या डावपेचाचा एक भाग होता, असा आरोप अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी केला आहे. येमेनमधील हौथी बंडखोर आणि गाझातील हमास यांना इराणकडून शस्त्रास्त्रे व पैसा पुरविला जात आहे. त्यामुळे अणुकरारावर इराणबरोबर चर्चा करायची असेल, तर हौथी बंडखोर आणि हमासला दहशतवादी ठरवून त्यांच्यावर कारवाई करता येऊ शकत नाही, कारण त्यामुळे इराण नाराज होऊ शकतो, असे बायडेन प्रशासनाला वाटत होते. याचा पुरेपूर लाभ इराणने घेतला. इराणबरोबर वाटाघाटी करायच्या असतील, तर हमासच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारता येणार नाही, असा बायडेन प्रशासनाचा समज होता व त्याचा लाभ घेऊन इराणने बायडेन यांच्या प्रशासनाला मुर्ख बनविले, अशी जहाल टीका अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली.

इराणची खुशामत करून आखाती क्षेत्रात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करता येईल, असल्या भ्रामक समजुतीमध्ये बायडेन प्रशासन वावरत आहे. पण इराण इस्रायलला ‘छोटा सैतान’ मानतो आणि अमेरिकेकडे ‘मोठा सैतान’ म्हणून पाहतो, याची आठवण माजी परराष्ट्रमंत्री व सीआयएचे माजी प्रमुख असलेल्या माईक पॉम्पिओ यांनी करून दिली. इराणची खुशामत करण्याच्या बायडेन प्रशासनाच्या प्रयत्नांनीच इस्रायल व गाझाचा संघर्ष घडवून आणला, असा ठपका पॉम्पिओ यांनी ठेवला आहे. याआधी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही सध्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या कमकुवतपणामुळेच हमासने इस्रायलवर हल्ला चढविण्याची हिंमत केली, असे फटकारले होते. आपण राष्ट्राध्यक्ष असताना, इस्रायलवर हल्ला चढविल्यास अमेरिकेच्या कारवाईची चिंता हमासला सतावत होती. म्हणूनच हमासने त्या काळात इस्रायलवर हल्ले चढविले नव्हते, असे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लक्षात आणून दिले होते.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info