तेल अविव – ‘अमेरिकेबरोबरची मैत्री किंवा इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखणे, यापैकी एका पर्यायाची निवड करायची असेल तर इस्रायल इराणला रोखण्याचा पर्याय स्वीकारेल. यासाठी अमेरिकेबरोबर तंटा झाला तरी हरकत नाही’, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केली. इराणबरोबर अणुकरारासाठी अमेरिकेचे बायडेन प्रशासन वाटाघाटी करीत आहे. अशा परिस्थितीत इस्रायलच्या पंतप्रधानांनी हा इशारा दिला आहे.
गेल्या आठवड्यात इस्रायलची मुख्य गुप्तचर यंत्रणा मोसादच्या प्रमुखपदी डेव्हिड बार्नी यांची निवड झाली. मंगळवारपासून बार्नी यांनी मोसादचे माजी प्रमुख योसी कोहेन यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखणे, ही इस्रायलची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे जाहीर केले.
‘इस्रायलच्या सुरक्षेला आज अनेक धोके आहेत. अगदी शेकडो रॉकेट हल्ल्यांपासून ते अण्वस्त्रनिर्मितीसाठी सुरू असलेले इराणचे प्रयत्न हे सारे इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरतात. इराण अण्वस्त्रसज्ज बनला तर इस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत, इराण अण्वस्त्रसज्ज होणार नाही, यासाठी इस्रायलने अथकपणे लढा द्यायला हवा’, असे नेत्यान्याहू म्हणाले.
‘इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायलला कठीण निर्णय घ्यावे लागणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. पण जर अमेरिकेची मैत्री आणि इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखणे, यापैकी एकाची निवड करायची झाल्यास इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्याचा पर्यायच निवडेल. यासाठी इस्रायल अमेरिकेबरोबर तंटा झाला, तरी त्याची पर्वा करणार नाही. कारण अमेरिकेबरोबरच्या मैत्रीपेक्षाही इस्रायलसाठी इराणला रोखणे महत्त्वाचे ठरते’, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी ठणकावले.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबरोबर फोनवरुन झालेल्या चर्चेत देखील इराणबाबतची इस्रायलची भूमिका ठामपणे मांडल्याचे नेत्यान्याहू यांनी सांगितले. अमेरिकेच्या साथीने किंवा अमेरिकेच्या सहकार्याखेरीज, इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होण्यापासून रोखल्यावाचून राहणार नाही, असे आपण म्हटल्याची आठवण नेत्यान्याहू यांनी करून दिली.
दरम्यान, व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या वाटाघाटी निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याच्या बातम्या याआधी प्रसिद्ध झाल्या होत्या. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने इराणला निर्बंधातून सवलत देण्याची तयारी केल्याचा दावा केला जातो. हमासबरोबरचा संघर्ष आणि इराणचा अणुकार्यक्रम यावर चर्चा करण्यासाठी इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ येत्या काही दिवसात अमेरिकेला रवाना होणार आहे. या पार्श्वभूमीवर, इस्रायलच्या पंतप्रधानांनी बायडेन प्रशासनाला नव्याने इशारा दिल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |