दोहा – आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दरात वाढ होऊन, लवकरच हे दर 100 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचतील, असा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बड्या इंधन कंपन्यांच्या सीईओंनी केला. गुंतवणूकीच्या अभावामुळे इंधनाच्या दरात वाढ होईल, असे या वरिष्ठ अधिकार्यांचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसांपासून इंधनाच्या दरात पहायला मिळालेल्या वृद्धीमुळे इंधन कंपन्या सुखावल्याचा दावा केला जातो. तर बुधवारी अमेरिकेच्या इंधन साठ्यात घसरण झाल्याच्या बातमीचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर झाल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे म्हणणे आहे.
येत्या वर्षअखेरीपर्यंत कच्च्या तेलाचे दर शंभर डॉलर्सवर पोहोचतील, असा दावा अमेरिकी विश्लेषकाने साधारण दहा दिवसांपूर्वी केला होता. वर्षाच्या दुसर्या सत्रात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची मागणी वाढली आणि कोरोनाची चौथी लाट टळली, तर ही गणिते जुळतील, असे या विश्लेषकाने म्हटले होते. यासाठी जगभरातील प्रमुख देशांची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणे आणि कच्च्या तेलाची मागणी प्रतिदिन 10 कोटी बॅरल्सपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे या विश्लेषकाने सांगितले होते. न्यूयॉर्क आणि इतर ट्रेडिंग हब्समध्ये या किंमतीवर सट्टेबाजारांनी करारांची खरेदी सुरू केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/crude-oil-prices-will-go-up-usd-100-per-barrel/