तेहरान – ‘इराणची अणुऊर्जा संस्था सध्या 20 ते 60 टक्क्यांपर्यंत युरेनियमचे संवर्धन करीत आहे. पण येत्या काळात इराणच्या नेतृत्वाला गरज भासली तर इराण हेच संवर्धन 90 टक्क्यांपर्यंतही नेऊ शकतो’, अशी खळबळ उडविणारी घोषणा इराणचे मावळते राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी केली. याद्वारे इराण अणुबॉम्बनिर्मितीच्या खूपच जवळ पोहोचल्याचा संदेश इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिल्याचा दावा केला जातो. अशा काळात अणुकराराबाबत व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या वाटाघाटी इराणने रोखल्याच्या बातम्या येत आहेत.
इराणच्या कॅबिनेट बैठकीत बोलताना राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी 90 टक्के युरेनियम संवर्धनाची घोषणा केली. त्याचबरोबर पाश्चिमात्य देशांच्या इराणविरोधी कारवायांवर रोहानी यांनी टीका केली. इराणचा फोर्दो अणुप्रकल्प बंद पाडण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी प्रयत्न केले. पण सध्या हा अणुप्रकल्प अधिक वेगाने काम करीत असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी केला. इराण 2015 सालच्या अणुकराराशी बांधिल नसल्यामुळे आण्विक तंत्रज्ञान मिळविण्याच्या वेगवेगळ्या शक्यतांवर विचार करीत असल्याचे, रोहानी यांनी बजावले.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/iran-could-increase-uranium-enrichment-to-90-percent/