वॉशिंग्टन – ‘अफगाणिस्तानातील सैन्यमाघार हा अमेरिकेसाठी सर्वोत्तम निर्णय होता’,अशी घोषणा करून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पुन्हा एकदा आपल्या निर्णयाचे समर्थन केले. तसेच अफगाणिस्तानची सुरक्षा त्या देशाच्या सरकार आणि लष्करावर होती. त्यामुळे अफगाणिस्तानातील अपयशासाठी त्या देशाचे लष्कर जबाबदार असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ठेवला. पण अमेरिकेच्या इतिहासातील विनाशकारी लष्करी माघारीसाठी बायडेन यांनी साऱ्या जगाची माफी मागावी, अशी मागणी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. या अपयशाला जबाबदार असलेल्या बायडेन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केली आहे.
अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर तालिबानच्या ताब्यात गेलेल्या अफगाणिस्तानात विदारक सत्य समोर येऊ लागले आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी मंगळवारी रात्री अमेरिकेच्या हमवी लष्करी वाहनातून कंदहार प्रांतात परेड काढली तसेच ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरमधून उड्डाणे केल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत.
तालिबानकडे सध्या 48 विमाने व हेलिकॉप्टर्स असून नाटोच्या काही सदस्य देशांच्या हवाईदलातही इतकी विमाने नसल्याचा दावा केला जातो. तर इराणच्या सेमनान-गर्मसार भागातही अमेरिकेची हमवी वाहने ट्रकमधून वाहून नेत असल्याचे फोटोग्राफ्स माध्यमांमध्ये फिरत आहेत. बायडेन यांच्यामुळे अमेरिकेचा अब्जावधी डॉलर्सचा शस्त्रसाठा तालिबान आणि अमेरिकेच्या शत्रूच्या हाती लागल्याची टीका जोर पकडू लागली आहे.
मात्र राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मंगळवारी अमेरिकेला संबोधित करताना पुन्हा एकदा आपल्या निर्णयाचे समर्थन केले. अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीचा निर्णय योग्यच होता, असे सांगून अमेरिकेला दिलेले वचन पूर्ण केल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केला. तर अफगाणिस्तानातील गोंधळासाठी लष्कर जबाबदार असल्याचा ठपका बायडेन यांनी ठेवला. अफगाणी लष्करामुळे तालिबानने ताबा घेतल्याचे बायडेन म्हणाले.
पण बायडेन यांच्या निर्णयावर माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कठोर भाषेत टीका केली. अफगाणिस्तानातील माघार ही अमेरिकेसाठी अपमानास्पद घटना असल्याचे ताशेरे ट्रम्प यांनी ओढले. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी बायडेन यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे पत्र संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांना पाठविले होते. ट्रम्प यांनी माजी लष्करी अधिकाऱ्यांची ही मागणी योग्य असल्याचे सांगून अमेरिकेचा अपमान करणाऱ्या बायडेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे ट्रम्प यांनी एका मुलाखतीत म्हटले. दरम्यान, अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री काँडोलिझा राईस आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच. आर. मॅक्मास्टर यांनी सैन्यमाघारीनंतरच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. अचानक झालेल्या या सैन्यमाघारीमुळे अफगाणिस्तानातील अनाथ मुले आणि नव्या पिढीकडे दुर्लक्ष करणे परवडणार नसल्याचे राईस आणि मॅक्मास्टर यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानातील एका अनाथाश्रमातील या मुलांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न करावे. कारण ही पिढी तालिबानच्या हाती पडली तर ते त्यांना दहशतवादी कारवायांसाठी वापरतील, अशी चिंता माजी परराष्ट्रमंत्री राईस आणि मॅक्मास्टर यांनी व्यक्त केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |