सैन्यमाघारीमुळे अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपले ‘डोळे’ आणि ‘कान’ गमावले आहेत – माजी परराष्ट्रमंत्री कॉंडोलिझा राईस

वॉशिंग्टन – ‘‘गेल्या वीस वर्षांच्या तुलनेत अमेरिका नक्कीच सुरक्षित बनली आहे. पण अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेण्याचा निर्णय चुकीचाच होता. कारण यामुळे अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपले ‘डोळे’ आणि ‘कान’ गमावले आहेत’’, अशी टीका अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉंडोलिझा राईस यांनी केली.

कॉंडोलिझा राईस

९/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी युद्ध छेडले होते. या हल्ल्यात किमान तीन हजार अमेरिकन्स मारले गेले होते. या घटनेला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीने अमेरिकेच्या तत्कालिन परराष्ट्रमंत्री कॉंडोलिझा राईस यांची मुलाखत घेतली. यामध्ये अमेरिकेतील सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या बदलांबाबत राईस यांना प्रश्‍न विचारला. त्यावर बोलताना माजी परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेच्या सुरक्षेत नक्कीच मोठे बदल झाल्याचे आणि अमेरिका आधीच्या तुलनेत सुरक्षित बनल्याचे सांगितले.

९/११च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंट’ आणि ‘नॅशनल काऊंटर टेररिझम सेंटर’ची निर्मिती केली. यामुळे पुढच्या काळातील अमेरिकेवरील दहशतवादी हल्ले रोखण्यात मदत झाल्याचे राईस म्हणाल्या. त्याचबरोबर अमेरिकेवर भीषण हल्ला चढविणार्‍या अल कायदाला मोडून काढण्यातही यश मिळाल्याचे माजी परराष्ट्रमंत्री यांनी स्पष्ट केले. पण ‘अमेरिकेला गेल्या २० वर्षांमध्ये मिळालेले यश आणि अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेण्याचा निर्णय, या दोन्ही निरनिराळ्या गोष्टी आहेत’, असे राईस यांनी ठणकावून सांगितले.

कॉंडोलिझा राईस

‘‘या सैन्यमाघारीसह अमेरिकेने अफगाणिस्तानातील ‘डोळे’ आणि ‘कान’ गमावले असून ही बाब मला व्यथित करणारी आहे. कारण अफगाणिस्तानातील सैन्यतैनातीसह दहशतवाद्यांवर नजर ठेवणे, त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होते. बगराम आणि इतर हवाईतळांमुळे अमेरिकेला दहशतवादी ठिकाणांवर ड्रोन हल्ले चढविता येत होते. म्हणून या सैन्यमाघारीसह अमेरिकेने आपले सामर्थ्य गमावले आहे’, अशी जळजळीत टीका माजी परराष्ट्रमंत्री राईस यांनी केली.

याआधीही राईस यांनी अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अफगाणिस्तानातील कान व डोळे यांचे महत्त्व असल्याचा उल्लेख केला होता. तसेच बायडेन प्रशासनाच्या पूर्ण माघारीच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला होता.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info