येमेनमधील संघर्षात १०६ जणांचा बळी – सौदीच्या विमानतळावर हौथी बंडखोरांचे ड्रोन्सचे हल्ले

एडन/रियाध – गेल्या ४८ तासांमध्ये येमेनमधील घातपात व हिंसाचारात १०६ जणांचा बळी गेला. रविवारी एडनमध्ये सरकारी वाहनावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात सहा जण दगावले असून इथले गव्हर्नर यातून थोडक्यात बचावले. तर मारिब येथील संघर्षात किमान शंभर हौथी बंडखोरांना ठार केल्याचा दावा येमेनचे लष्कर करीत आहेत. हौथी बंडखोरांनी देखील शनिवारी सौदी अरेबियाच्या महत्वाच्या प्रवासी विमानतळावर ड्रोन्सचे हल्ले घडविले होते. अमेरिका, युएई, इजिप्त या देशांनी या ड्रोन हल्ल्याची कठोर शब्दात निर्भत्सना केली आहे.

येमेनमधील

गेल्या काही दिवसांपासून येमेनमधील राष्ट्राध्यक्ष हादी यांचे सरकार आणि हौथी बंडखोरांमधील संघर्ष जोर पकडत आहे. इराणचे समर्थन मिळालेले हौथी बंडखोर मारिबसह येमेनमधील प्रमुख शहर तसेच उत्तरेकडील सौदी अरेबियाच्या ठिकाणांवर हल्ले चढवित आहेत. शुक्रवारपासून हौथी बंडखोरांनी मारिब शहरावर ताबा मिळविण्यासाठी आणखी एक अपयशी प्रयत्न केला. सुमारे ४८ तासांच्या संघर्षानंतर येमेनचे लष्कर व हादी सरकारशी संलग्न असलेल्या सशस्त्र टोळ्यांनी हौथी बंडखोरांचे हल्ले उधळले.

१०६ जणांचा बळी

यामध्ये हौथींचे किमान १०० बंडखोर ठार झाल्याचा दावा येमेनच्या लष्कराने केला. हौथी बंडखोरांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रविवार दुपारपर्यंत हौथी बंडखोरांचे ६४ मृतदेह मारिब रुग्णालयात आणले गेले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून इंधनसंपन्न मारिबसाठी सुरू असलेल्या संघर्षात एवढ्या मोठ्या संख्येने हौथी बंडखोरांना जीवितहानी स्वीकारावी लागली आहे. या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी हौथी बंडखोरांनी शनिवारी सौदी अरेबियाच्या जझान शहरातील किंग अब्दुल्ला विमानतळावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन्सचे हल्ले चढविले.

१०६ जणांचा बळी

सौदीच्या विमानतळावर चढविलेल्या या हल्ल्यात विमानतळावरील प्रवासी व कर्मचारी जखमी झाले. यामध्ये सौदी, बांगलादेशी व सुदानच्या नागरिकांचा समावेश आहे. प्रवासी विमानतळाला लक्ष्य करून नागरिकांचा जीव धोक्यात टाकणार्‍या हौथीच्या या ड्रोन हल्ल्यांवर जझानचे डेप्युटी गव्हर्नर प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुलअझिझ यांनी संताप व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून सौदीच्या प्रवासी विमानतळांवरील हौथी बंडखोरांचे हल्ले वाढले आहेत.

या हल्ल्याला काही तास उलटत नाही तोच रविवारी सकाळी येमेनच्या एडन शहरात मोठा बॉम्बस्फोट झाला. एडनचे गव्हर्नर अहमद लमलास आणि कृषीमंत्री सालेम अल-सुकात्री यांच्या वाहनाला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी हा स्फोट घडविला. लमलास व सालेम या हल्ल्यातून बचावले. पण यावेळी झालेल्या शक्तीशाली स्फोटात सहा नागरिकांचा बळी गेला असून इतर गंभीर जखमी झाले आहेत.

येमेन पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचा इशारा काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी दिला होता. अमेरिकेने सौदी अरेबियातील आपली हवाई सुरक्षा यंत्रणा काढून घेतल्यामुळे सौदीची हवाई सुरक्षा प्रभावित झाली अहे. हौथी बंडखोर याचा फायदा घेऊन सौदीवरील आपले हल्ले वाढवत आहेत. गेल्या महिन्यात थेट सौदीच्या पूर्वेकडील भागावर क्षेपणास्त्रे डागून हौथींनी आपले इरादे उघड केले होते. प्रत्युत्तरादाखल सौदीने हौथींवर हल्ले चढविले तर इतर अरब मित्रदेश देखील सौदीच्या गटातून या संघर्षात सहभागी होतील. यामुळे येमेनमध्ये पुन्हा संघर्ष भडकेल, असा इशारा या विश्‍लेषकांनी आधीच दिला होता.

हिंदी हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info