दमास्कस – सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात १४ जण ठार झाले. यानंतर सिरियन लष्कराने इदलिब प्रांतात चढविलेल्या तोफांच्या हल्ल्यात १३ जणांचा बळी गेला. यामध्ये शाळकरी मुलांचा समावेश असल्याचा दावा केला जातो.
सिरियन जवानांना वाहून नेणारी बस दहशतवाद्यांनी बॉम्बने उडवून दिली. यावेळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटात १४ जण ठार झाले तर आठ जण जखमी झाले. जखमींमध्ये मुलांचा समावेश आहे. तर स्फोटाच्या ठिकाणी तिसरा बॉम्ब सापडल्यानंतर सिरियन लष्कराने तो निकामी केला. गेल्या तीन वर्षांमध्ये राजधानी दमास्कसमध्ये झालेला हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट ठरतो.
रशियाच्या मध्यस्थीने सिरियन सरकार व दहशतवादी संघटनांमधील संघर्षबंदीनंतर सिरियातील घातपाती हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले होते. पण बुधवारच्या स्फोटानंतर सिरियन लष्कर व दहशतवाद्यांमधील संघर्षबंदी निकालात निघाल्याचे दिसत आहे. या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण सिरियातील अस्साद राजवटीला विरोध करणारी आयएस, हयात तहरिर अल-शाम या दहशतवादी संघटनांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या स्फोटानंतर काही तासातच सिरियन लष्कराने इदलिब प्रांतातील अरिहा शहरावर तोफांचे हल्ले चढविले. अरिहा शहरात दहशतवाद्यांचा तळ आहे. त्यामुळे सिरियन लष्कराने दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला चढविल्याचे जाहीर केले. पण या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये शाळकरी मुलांचा समावेश असल्याची टीका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सिरियन लष्कराने उत्तरेकडील भागात कारवाईचा वेग वाढविला आहे. रशियाची लढाऊ विमाने देखील सिरियन लष्कराला या कारवाईत सहाय्य करीत आहेत. काही दिवसांपूर्वी सिरियन लष्कर व रशियन विमानांनी सिरियाच्या उत्तरेकडील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला चढविला होता. या हल्ल्यात तुर्कीसंलग्न दहशतवाद्यांचा खातमा झाल्याचे बोलले जाते. यावर तुर्कीने संताप व्यक्त करून सिरियन लष्कराला धडा शिकविण्यासाठी सिरियात जोरदार कारवाई करण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, सिरियातील स्थैर्यावर चर्चा करण्यासाठी नुकतीच रशिया व इराण यांच्यात बैठक पार पडली होती. याचे तपशील उघड होऊ शकलेले नाहीत. मात्र दशकभरापासून सुरू असलेल्या सिरियातील गृहयुद्धात अनेक देश गुंतलेले आहेत. त्यामुळे सिरियातील संघर्षाला विराम मिळण्याची शक्यता सध्या तरी दृष्टीपथात नाही. उलट या देशातील रक्तरंजित संघर्ष अधिकच तीव्र होण्याची भयावह शक्यता नव्याने समोर येत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |