जगातील ३० हून अधिक देशांमध्ये ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’चा फैलाव

- दक्षिण आफ्रिकेत २४ तासांमध्ये रुग्णांची संख्या दुपटीने वाढली

३० हून अधिक

जीनिव्हा/लंडन – दक्षिण आफ्रिकेतून सुरू झालेल्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’च्या संसर्गाची व्याप्ती वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यात समोर आलेल्या ओमिक्रॉनचा ३० हून अधिक देशांमध्ये फैलाव झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण आफिक्रेत रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून २४ तासांमध्ये रुग्णसंख्येत दुपटीने भर पडली आहे. येत्या काही महिन्यात युरोपमध्ये आढळणार्‍या कोरोना रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण ओमिक्रॉनचे असू शकतात, असा इशारा युरोपियन यंत्रणेने दिला.

कोरोनाची तीव्रता कमी करण्यात यश मिळविलेल्या दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यासाठी ओमिक्रॉन व्हेरिअंट कारणीभूत ठरत असून एका आठवड्यात रुग्णांची संख्या चार पटीने वाढली आहे. गेल्या २४ तासात दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचे ८,५६१ रुग्ण नोंदविण्यात आले असून रुग्णांच्या संख्येत जवळपास १०० टक्क्यांची भर पडल्याची माहिती देण्यात आली. संशयित रुग्ण पॉझिटिव्ह ठरण्याची टक्केवारी १६ टक्क्यांवर गेली आहे. तर रुग्णालयात दाखल होणार्‍या कोरोना रुग्णांच्या संख्येत २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

३० हून अधिक

दक्षिण आफ्रिकेतील आरोग्यतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीत ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्णामध्ये सौम्य लक्षणे आढळत असल्याचे म्हटले आहे. मात्र लस घेतलेल्या तसेच एकदा कोरोना झालेल्यांनाही या व्हेरिअंटचा संसर्ग होत असल्याचे उघड झाल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले. संसर्ग वेगाने वाढत असला तरी तो घातक ठरण्याचे प्रमाण कमी असल्याचे निरीक्षणही आफ्रिकेतील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्यामुळे सध्या ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे मोठी भीती बाळगण्याची गरज नसल्याचा दावा ‘आफ्रिका सीडीसी’ या संस्थेकडून करण्यात आला.

३० हून अधिक

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर ओमिक्रॉनची व्याप्ती हळुहळू वाढत असल्याचे समोर येत आहे. अवघ्या एका आठवड्याच्या कालावधीत जगातील जवळपास ३४ देशांमध्ये नव्या व्हेरिअंटचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळणार्‍या देशांमध्ये जवळपास १९ देशांची भर पडली आहे. त्यात अमेरिका, भारत, सौदी अरेबिया, जपान, नॉर्वे, नायजेरिया यासारख्या देशांचा समावेश आहे. नॉर्वेत एका दिवसात ओमिक्रॉनचे ५०हून अधिक रुग्ण आढळले आहेत.

ओमिक्रॉनचा सर्वाधिक फैलाव युरोपिय देशांमध्ये झाला असून आतापर्यंत जवळपास १८ देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. नव्या व्हेरिअंटमुळे युरोपातील रुग्णसंख्या अधिक वेगाने वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत फ्रान्समधील बहुतांश रुग्ण ओमिक्रॉनचे असतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर पुढील दोन ते तीन महिन्यात युरोपात आढळणार्‍या रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण ओमिक्रॉनचे असतील, असा इशारा युरोपियन आरोग्य यंत्रणेने व्यक्त दिला.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info