बेलारुसमध्ये रशियाची अण्वस्त्रे तैनात होणार

रशियाची अण्वस्त्रे

मॉस्को/मिन्स्क – युुक्रेनच्या मुद्यावरून रशिया व पाश्‍चात्य देशांमधील तणाव विकोपाला गेला असतानाच बेलारुसने रशियाची अण्वस्त्रे तैनात करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यासाठी बेलारुसच्या राज्यघटनेत सुधारणा करण्यात आल्या असून लवकरच त्याला मान्यता मिळेल, असा दावा सूत्रांनी केला. काही दिवसांपूर्वीच रशियाने बेलारुसमध्ये आपली ‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’ धाडल्याचे समोर आले होते. त्यानंतर रविवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, नाटोबरोबरील तणाव कमी करण्यासाठी रशियाने दिलेला प्रस्ताव नाकारलाच, तर निराळ्याच पर्यायांचा वापर करून त्याला उत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा दिला होता.

रशियाची अण्वस्त्रे

बेलारुसमध्ये गेल्या ऑगस्ट महिन्यापासून राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर केलेल्या कारवाईवरून पाश्‍चात्य देशांनी लुकाशेन्को यांच्यावर निर्बंध लादले आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाची मदत घेतली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बेलारुसबरोबर संरक्षण तसेच व्यापारी करार केले आहेत. याबदल्यात बेलारुसमधील रशियन सैन्याची तैनाती वाढविण्यात आली असून रशियन संरक्षणयंत्रणाही तैनात करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. रशियाच्या या तैनातीला अधिकृत मान्यता देण्यासाठी तसेच आपली सत्ता टिकविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी देशाच्या राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचे विधेयक सादर केले आहे.

रशियाची अण्वस्त्रे

त्यात बेलारुस ‘न्यूक्लिअर फ्री झोन’ राहिल ही तरतूद हटविण्यात आली आहे. बेलारुस भूराजकीय समीकरणांपासून दूर असणारे अलिप्त राष्ट्र असेल ही वाक्यरचनाही काढून टाकण्यात आली आहे. याकडे रशियन माध्यमे व विश्‍लेषकांनी लक्ष वेधले असून अण्वस्त्रे तैनात करण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याचा दावा केला आहे. गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को व काही दिवसांपूर्वीच बेलारुसच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही यासंदर्भात वक्तव्य केले होते.

‘बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या हद्दीत रशियाची अण्वस्त्रे तैनात करण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहोत. हे नाटोकडून पोलंडमध्ये होणार्‍या क्षेपणास्त्र तैनातीला उत्तर असेल’, असे बेलारुसचे परराष्ट्रमंत्री व्लादिमिर मेकेई यांनी म्हटले होते. बेलारुसने रशियाची प्रगत ‘एस-४००’ ही हवाईसुरक्षा यंत्रणा तैनात करण्याचीही तयारी दर्शविली आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियाने एक लाखाहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. नव्या वर्षात रशिया युक्रेनवर हल्ला चढविणार असल्याचे इशारे अमेरिका व युरोपिय देश देत आहेत. रशियन राष्ट्राध्यक्षांनी हा तणाव कमी करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. युक्रेन तसेच रशियाच्या प्रभावक्षेत्रात येणार्‍या देशांना नाटोत सहभागी करण्याचा विचार सोडून द्या आणि या देशांमध्ये अमेरिका-नाटोचे लष्करी तळ उभारण्याचे प्रयत्न थांबवा, अशी मागणी या प्रस्तावात आहे. रशियाने दिलेला प्रस्ताव आपल्याला मान्य नसल्याचे संकेत अमेरिका व नाटोने दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, वेगळ्या पर्यायांचा उल्लेख करून प्रस्ताव फेटाळल्यास भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची जाणीव करून दिली होती. त्यानंतर बेलारुसमध्ये अण्वस्त्रांच्या संभाव्य तैनातीचे वृत्त समोर येणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info