युरोपमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता बळावली

- पोलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

युद्धाचा भडका

व्हिएन्ना/मॉस्को – गेल्या तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच युरोपात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता बळावली आहे, असा इशारा पोलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला आहे. पोलंडच्या इशाऱ्यापूर्वी रशियानेही लष्करी पर्यायांचा वापर करण्यात येईल, असे बजावले आहे. तर अमेरिकेने रशियाबरोबर युद्धासाठी तयार रहावे, असे वक्तव्य अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे. एकापाठोपाठ समोर आलेल्या या वक्तव्यांमुळे युक्रेन मुद्यावरून लवकरच युद्ध पेट घेईल, अशी भीती विश्‍लेषक व माध्यमांकडून व्यक्त होत आहे.

युद्धाचा भडका

गेल्या चार दिवसात रशिया व पाश्‍चात्य देशांमध्ये तीन मोठ्या बैठका पार पडल्या. युक्रेन मुद्यावरून झालेल्या या बैठकांमध्ये अमेरिकेसह इतर पाश्‍चात्य देशांनी रशियाकडून करण्यात आलेल्या मागण्या फेटाळल्याचे सांगण्यात येते. या वृत्ताला रशियाकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी, युक्रेन मुद्यावरील चर्चेत ‘डेड एन्ड` आला असून बोलणी पुढे चालू ठेवण्यात काहीही अर्थ राहिलेला नाही, अशा थेट शब्दात वाटाघाटींची शक्यता संपल्याचे स्पष्ट केले.

रशियाचे वरिष्ठ अधिकारी अलेक्झांडर ग्रुश्‍को यांनीही, चर्चेने कोंडी फुटलेली नसून रशिया आपल्या सुरक्षेसाठी लष्करी पर्यायाचा वापर करेल, असा इशारा दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनीही अमेरिकेला इशारा दिल्याचे समोर आले आहे. ‘अमेरिकेने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांवर निर्बंध लादल्यास ही बाब मर्यादा ओलांडणारी ठरेल. या मुद्यावरून रशिया अमेरिकेबरोबरील संबंध तोडू शकतो`, असे पेस्कोव्ह यांनी बजावले.

युद्धाचा भडका

दरम्यान, गुरुवारी व्हिएन्नात झालेल्या ‘ओएससीई` गटाच्या बैठकीत, पोलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युद्धाचा इशारा दिला. रशियाचे थेट नाव न घेता पूर्व युरोपमध्ये लष्करी संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता वाढली आहे, असे पोलंडचे परराष्ट्रमंत्री झिबिग्न्यू राउ यांनी बजावले. रशियाकडून जॉर्जिया, मोल्दोवा, आर्मेनिया यासारख्या देशांमध्ये करण्यात आलेल्या कारवायांकडेही राउ यांनी लक्ष वेधले. युरोपमध्ये गेल्या 30 वर्षात कधीही उद्भवला नव्हता असा युद्धाचा धोका आता बळावला असल्याचा इशाराही पोलिश परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या माजी अधिकारी एव्हलिन फर्कास यांनी, अमेरिकेने रशियाबरोबरील युद्धासाठी तयार रहावे, असा दावा केला आहे. रशियाकडून युक्रेनवर आक्रमण होण्याची शक्यता बळावली असल्याचे फर्कास यांनी एका लेखात म्हटले आहे. फर्कास यांनी 2012-15 या कालावधीत ‘डेप्युटी असिस्टंट सेक्रेटरी` म्हणून जबाबदारी सांभाळली होती. रशियाने युक्रेनच्या सीमेवर सुमारे एक लाख जवान तैनात केल्याचा दावा अमेरिका व युक्रेनकडून करण्यात आला आहे. ही तैनाती युक्रेनवरील नव्या आक्रमणाची तयारी असल्याचे इशारे पाश्‍चात्य नेते तसेच विश्‍लेषकांकडून देण्यात येत आहेत. फर्कास यांचे वक्तव्यही त्याचाच भाग दिसत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info