वॉशिंग्टन – ‘राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इराणच्या अणुकाराराचे प्रकरण भयानकरित्या हाताळत आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली तर, बायडेन यांच्यांमुळे इराणला दहावा अण्वस्त्रधारी देश बनेल. यामुळे बायडेन यांच्यानंतर सत्तेवर येणार्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पुढील काही वर्षांसाठी बरेच काही सहन करावे लागेल’, असा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख जॉन रॅटक्लिफ यांनी दिला.
अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जॉन रॅटक्लिफ यांनी बायडेन प्रशासनाच्या इराणविषयक हालचालींवर चिंता व्यक्त केली. इराणच्या अणुकराराबाबतची बायडेन यांची भूमिका अमेरिकेसह आखाती क्षेत्रासाठी धोकादायक ठरेल, असे रॅटक्लिफ म्हणाले. यासाठी गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुखांनी वर्षभरापूर्वी तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांचा दाखला दिला.
माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अब्राहम कराराद्वारे इस्रायल आणि अरब देशांना एकत्र आणून आखातात शांती प्रस्थापित केली. त्याचबरोबर इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादून इराणला आर्थिकदृष्ट्या कमजोर आणि प्रभावहीन केले होते, याची आठवण रॅटक्लिफ यांनी करुन दिली. ‘ट्रम्प यांच्या धोरणांमुळे इराण अक्षरश: दिवाळखोर बनत चालला होता. ट्रम्प प्रशासनाने कासेम सुलेमानी सारख्या इराणच्या दहशतवाद्यांवर कारवाई केली. यामुळे इराणवरील दडपण वाढले होते. पण वर्षभरात परिस्थिती पूर्ण बदलली आहे’, अशी टीका रॅटक्लिफ यांनी केली.
‘गुडघ्यावर आलेल्या इराणला बायडेन प्रशासनाने वाटाघाटींचे अधिकार दिले आहेत. इराणच्या अपयशी अणुकराराला पुन्हा जिवंत केले जात असून यामध्ये अमेरिकेला आपली बाजूही मांडण्याचा अधिकार उरलेला नाही. याउलट अमेरिकेचे दोन शत्रूदेश, चीन आणि रशिया इराणसोबत वाटाघाटी करीत आहेत’, याकडे रॅटक्लिफ यांनी लक्ष वेधले. इराणची सेंट्रल बँक, राष्ट्रीय इंधन कंपनी, रिव्होल्युशनरी गार्ड्स यांच्यावरील निर्बंध काढून काहीही फरक पडणार नसल्याचे परखड मत रॅटक्लिफ यांनी मांडले.
तसेच बायडेन प्रशासन दहशतवाद्यांशी वाटाघाटी करीत असल्याचा आरोप रॅटक्लिफ यांनी केला. या चर्चेद्वारे बायडेन प्रशासन इराणला काहीही करण्यासाठी ‘ब्लँक चेक’ देत असल्याचा ठपका अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुखांनी ठेवला. ‘या वाटाघाटीद्वारे इराण अमेरिकेला आपल्या इशार्यावर नाचवत असल्याचे, आखातातील अमेरिकेचा सर्वात मोठा मित्रदेश असलेला इस्रायल ओरडून सांगत आहे. इराण अणुबॉम्ब निर्मितीच्या जवळ पोहोचत असून ट्रम्प यांच्याप्रमाणे इराणवर अधिकाधिक दबाव टाकण्याची आवश्यकता आहे, याकडे इस्रायल सातत्याने लक्ष वेधत आहे. पण बायडेन प्रशासन याच्या विरोधात काहीही करायला तयार नाही’, अशी घणाघाती टीका रॅटक्लिफ यांनी केली.
दरम्यान, बायडेन प्रशासन इराणबरोबरील अणुकराराच्या अगदी जवळ पोहोचल्याचा दावा अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. तर अमेरिकेने आमच्या मागण्या मान्य केल्या तरच २०१५ सालचा अणुकरार पुनर्जीवित होईल, असे इराणने बजावले आहे. अशा परिस्थितीत रॅटक्लिफ यांच्यासारखे अमेरिकेच्या गुप्तचर व संरक्षणदलांचे माजी अधिकारी बायडेन प्रशासनावर सडकून टीका करीत आहेत. विरोधी पक्षनेते देखील बायडेन यांच्या धोरणांमुळे अमेरिकेचा आखाती क्षेत्रावरील प्रभाव संपुष्टात येत असल्याची जाणीव करून देत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |