मॉस्को – युक्रेनचा नाटोत समावेश झाल्यास ही गोष्ट रशिया व नाटोदरम्यान अणुयुद्धाचा भडका उडविणारी ठरेल आणि यात कोणीच जिंकणार नाही, असा खरमरीत इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतच पुतिन यांनी हा इशारा दिल्याचे समोर आले आहे. या इशार्याच्या पार्श्वभूमीवर रशियाने युरोपमधील कॅलिनिनग्रॅड संरक्षणतळावर ‘किन्झाल’ ही आण्विक क्षमता असणारी हायपरसोनिक क्षेपणास्त्रे व ‘मिग-३१के’ लढाऊ विमाने तैनात केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रशिया व युक्रेनमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी सोमवारी रशियाचा दौरा केला. यावेळी मॅक्रॉन यांनी राजधानी मॉस्कोमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास सहा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. परिषदेदरम्यान पाश्चात्य देशांवर आरोप करतानाच पुतिन यांनी अणुयुद्धाचा इशारा दिला.
‘युक्रेनचा नाटोत समावेश झाला आणि त्यांनी क्रिमिआ ताब्यात घेण्यासाठी लष्करी कारवाई केली तर युरोपिय देश रशियाविरोधातील युद्धात खेचले जातील. नाटो व रशिया यांच्या लष्करी सामर्थ्याची तुलना होऊ शकता नाही आणि याची रशियाला कल्पना आहे. पण रशिया जगातील आघाडीच्या अण्वस्त्रसज्ज देशांपैकी एक आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर रशियाने या क्षेत्रात इतर देशांनाही मागे टाकले आहे. युरोपिय देश इच्छा नसतानाही अशा युद्धात खेचले जातील व युद्धाच्या भडक्यात कोणीही जिंकणार नाही’, अशा शब्दात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अणुयुद्धाचे संकेत दिले.
फ्रान्स व रशियातही संघर्षाचा भडका उडू शकतो, पण आपल्याला तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनाही असा संघर्ष नको आहे, असा दावाही पुतिन यांनी केला. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी चर्चेदरम्यान दिलेले काही प्रस्ताव सकारात्मक असून पुढील राजनैतिक वाटाघाटींसाठी ते उपयुक्त ठरतील, असे संकेतही त्यांनी दिले. मॅक्रॉन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान, रशिया युक्रेन सीमेवर नव्या लष्करी हालचाली करणार नाही असे आश्वासन देण्यात आल्याचा दावा फ्रेंच सूत्रांनी केला आहे. मात्र त्याला रशियाकडून दुजोरा मिळालेला नाही. पुतिन यांच्याबरोबरील चर्चेनंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मंगळवारी युक्रेनमध्ये दाखल झाले आहेत.
दरम्यान, रशियाने युरोपमधील संरक्षणतळ असणार्या कॅलिनिनग्रॅडमध्ये लष्करी हालचाली सुरू केल्याचे समोर येत आहे. रशियाने कॅलिनिनग्रॅड तळावर हायपरसोनिक न्यूक्लिअर क्षेपणास्त्रे व प्रगत लढाऊ विमाने तैनात केली आहेत. त्याचवेळी ब्लॅक सी सागरी क्षेत्रासाठी नव्या युद्धनौका रवाना केल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |