युक्रेनवर रशियाचे निर्णायक हल्ले

मॉस्को/किव्ह – अमेरिका आणि नाटोच्या आश्‍वासनावर भिस्त ठेवून रशियाच्या इशार्‍यांकडे दुर्लक्ष करणार्‍या युक्रेनाला या घोडचुकीची जबरदस्त किंमत चुकती करावी लागत आहे. रशियाने युक्रेनवर तीन बाजूंनी हल्ले सुरू केले असून युक्रेनची राजधानी किव्हच्या काही भागांवर रशियन फौजांनी नियंत्रण मिळविल्याच्या बातम्या येत आहेत. युक्रेनची ७४ लष्करी ठिकाणे रशियाने हवाई हल्ल्याद्वारे नष्ट केली. युक्रेनचे लष्कर व हवाई दल रशियन सैन्याचा प्रतिकार जरूर करीत आहे. पण रशियाच्या सामर्थ्यापुढे युक्रेनचे लष्कर टिकू शकणार नाही, हे रशियाने मारलेल्या लष्करी मुसंडीने स्पष्ट झाले. रशियाने युक्रेनची राजधानी किव्हचा ताबा राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची राजवट उलथण्याची तयारी केल्याचे काही वृत्तसंस्थांचे म्हणणे आहे.

युक्रेनवर

स्थानिक प्रमाणवेळेनुसार पहाटे ३.३० च्या सुमारास युक्रेनच्या मारी पोल शहरावर रशियाने घणाघाती हल्ले चढविले. पूर्व युक्रेन, क्रिमिआ आणि बेलारूस अशा तीन बाजूंनी रशियन संरक्षणदलांनी युक्रेनवर आक्रमण केले. लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि क्षेपणास्त्रांचा मारा करून रशियाने युक्रेनी हवाई दल व लष्कराची दाणादाण उडविली. युक्रेनच्या सीमेवरील जवान व लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून रशियाने या देशाच्या बचावाची पहिली फळी उडवून दिली. त्यानंतरच्या काळात युक्रेनमधील दुसर्‍या क्रमांकाचे शहर असलेल्या खारकिव्हमध्ये रशियन रणगाडे, लष्करी वाहनांनी हल्ला चढविला. या काळात रशियाची लढाऊ विमाने युक्रेनच्या हवाई दल तसेच लष्कराच्या ठिकाणांवर बॉम्बचा वर्षाव करीत होती.

युक्रेनचे लष्कर रशियाला प्रतिकार करीत आहे, असे दावे पहिल्या काही तासात समोर आले होते. रशियाची लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स आपण पडल्याचा दावा युक्रेनने केला. पण काही तासातच युक्रेन रशियन झंझावातासमोर टिकणार नसल्याचे उघड झाले. युक्रेनच्या नौदलाची रशियाने कोंडी केली. याद्वारे युक्रेनला सागरी मार्गाने कुणाचेही सहाय्य मिळणार नाही, याची तजवीज रशियाने केल्याचे दिसत आहे.

रशियाच्या या हल्ल्यानंतर फार मोठ्या उलथापालथी सुरू झाल्या खर्‍या. पण रशियाला धमक्या देऊन निर्बंध लादण्याच्या पलिकडे अमेरिका व नाटोने सध्या तरी दुसरे काहीही केलेले नाही. युक्रेनच्या बाजूने रशियाच्या विरोधात युद्ध पुकारता येणार नाी, असे अमेरिका व नाटोही मान्य केले आहे. मात्र नाटोच्या सदस्यदेशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती तैनाती करण्यात येत असल्याचे नाटोचे प्रमुख जनरल स्टोल्टनबर्ग यांनी जाहीर केले.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी जनतेला मिळेल ते शस्त्र हाती घेऊन रशियन फौजांचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. तर दुसर्‍या बाजूला युक्रेनची राजधानी किव्हचा ताबा घेण्यासाठी रशियाने जबरदस्त लष्करी हालचाली सुरू केल्या होत्या. युक्रेनी हवाई दलाचा राजधानी किव्हमधील तळ सध्या रशियन हवाई दलाच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते. ही लष्करी कारवाई रशियाने युक्रेनचा ताबा घेण्यासाठी नाही, तर युक्रेनचे रशियाविरोधी सरकार उलथण्यासाठी केलेली आहे, असे विश्‍लेषक सांगत आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info