किव्ह – युक्रेनमधील युद्ध अधिकाधिक भीषण बनत चालले असून तिसर्या दिवशीही रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढल्याचे दिसत आहे. युक्रेनचे लष्करे रशियाचा प्रतिकार करीत असल्याचे दावे या देशाचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले आहेत. तर युक्रेनची राजधानी किव्हचा पूर्ण ताबा घेण्यासाठी आगेकूच करीत असलेल्या रशियन लष्कराबरोबर युक्रेनचे जवान रस्त्यांवर लढत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनवरील हल्ल्याची रशियाला अधिक मोठी किंमत चुकती करण्यासाठी अमेरिका व नाटोने युक्रेनला कोट्यवधी डॉलर्सचे लष्करी सहाय्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.
रशियन हवाई दलाची विमाने पाडल्याचे दावे युक्रेनच्या लष्कराने केले. इतकेच नाही तर रशियाच्या किव्हवरील आक्रमणाला युक्रेनच्या लष्कराकडून कडवा प्रतिकार केला असल्याचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. राजधानी किव्ह ताब्यात घेण्यासाठी आगेकूच करीत असलेल्या रशियन लष्कराला युक्रेनी लष्कराने रस्त्यावर थोपविल्याचे दावे केले जातात. किव्हच्या रस्त्यावर जबरदस्त संघर्ष पेटल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे. तसेच रशियाने युक्रेनमधील नागरी वस्त्यांना लक्ष्य करणारे हवाई हल्ले चढविले असून यात जनसामान्यांचा बळी जात असल्याचे आरोप होत आहेत. रशियाने मात्र नागरी वस्त्यांना लक्ष्य केले जात नसल्याचे सांगून हे आरोप फेटाळले आहेत. युक्रेनच्या लष्कराने आपली विमाने पाडल्याचे खोटेनाटे व्हिडिओज् प्रसिद्ध केल्याचे ठपक रशियाने ठेवला आहे.
रशियासमोर टिकाव धरणे अवघड बनत चाललेल्या युक्रेनसाठी अमेरिका व नाटोने कोट्यवधी डॉलर्सच्या लष्करी सहाय्याची घोषणा केली. अमेरिका युक्रेनला ३५ कोटी डॉलर्सचे लष्करी सहाय्य पुरविणार असून नाटो आपल्या सदस्यदेशांमार्फत युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरवित आहे. याद्वारे युक्रेनमधील युद्धात रशियाला अधिक हानी सहन करण्यास भाग पाडण्याची अमेरिका व नाटोची योजना असल्याचे सांगितले जाते. या युद्धात रशिया थर्मोन्यूक्लिअर शस्त्राच्या श्रेणीत येणार ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर करू शकेल, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्याची तयारीही केली आहे, असा ठपका पाश्चिमात्य देशांच्या अधिकार्यांनी ठेवला आहे.
दरम्यान, अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह तसेच रशियाच्या ‘नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिल’च्या सदस्यांवर निर्बंध लादले आहेत.
फिनलंड आणि स्वीडनला रशियाचा इशारा
फिनलंड आणि स्वीडन या देशांनी नाटोचे सदस्यत्त्व स्वीकारून आपली सुरक्षा धोक्यात टाकू नये. तसे झाले तर त्याचे भयंकर लष्करी व राजकीय परिणाम या दोन्ही देशांना भोगावे लागतील, असा सज्जड इशारा रशियाने दिला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झकारोव्ह यांनी दिलेला हा इशारा आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये गाजत आहे. रशिया विस्तारवादी धोरणे स्वीकारत असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे दावे अमेरिका व काही युरोपिय देशांमधून केले जात आहेत.
युक्रेनला सहाय्य पुरविण्याचा प्रयत्न करणार्या देशांना इतिहासाने पाहिले नसतील, असे परिणाम भोगण्यास भाग पाडू, अशी धमकी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली होती. त्या पाठोपाठ फिनलंड आणि स्वीडन या देशांनाही रशियाने सज्जड इशारा दिल्याचे दिसत आहे. या दोन्ही देशांनी नाटोमध्ये सहभागी होण्याचा विचारही करता कामा नये. तसे करून फिनलंड आणि स्वीडनने आपली सुरक्षा धोक्यात टाकू नये, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या झकारोव्हा यांनी बजावले आहे. तसेच याचे लष्करी व राजकीय परिणाम भोगावे लागतील, असे सांगून झकारोव्हा यांनी थेट उल्लेख न करता युक्रेनचा दाखला दिल्याचे दिसते.
दरम्यान, रशियाने दिलेल्या या इशार्याचा दाखला देऊन, पाश्चिमात्य माध्यमांनी रशिया सार्या युरोपवर वर्चस्व गाजविण्याच्या तयारीत असल्याचे आरोप केले. अमेरिकेतूनही असे आरोप होत असून रशियाची वर्चस्ववादी मानसिकता यातून जगासमोर येत असल्याचा ठपका अमेरिकेतून ठेवला जात आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |