मॉस्को/किव्ह – युक्रेनची राजधानी किव्हवर जबरदस्त हल्ले कायम ठेवून रशियन सैन्याने लिव्ह शहरावर क्षेपणास्त्रांचे जोरदार हल्ले चढविले. युक्रेनमधील ही लष्करी कारवाई तीव्र करीत असतानाच, रशियन जनता राष्ट्राध्यक्षांच्या सोबत नसल्याच्या आरोपांनाही व्लादिमिर पुतिन यांनी उत्तर दिले. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दोन लाख जणांचा सहभाग असलेली रॅली राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आयोजित केली होती. याद्वारे अमेरिका व मित्रदेशांचे दावे रशियन राष्ट्राध्यक्षांनी खोडून काढल्याचे दिसत आहे.
युक्रेनमधील युद्धाच्या २३ व्या दिवशीही रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह तसेच लिव्ह शहरावर जोरदार हल्ले चढविले. लिव्ह शहरावर रशियन सैन्याने क्षेपणास्त्रांचा मारा केला. यात इथल्या काही महत्त्वाच्या इमारती कोसळल्या असून रशियाने नागरी वस्त्यांनाही लक्ष्य केल्याचा आरोप पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत. युक्रेनचे लिव्ह शहर पोलंडच्या सीमेपासून खूपच जवळ असल्याने रशियाचे हे हल्ले पोलंडला इशारा देणारे असल्याचे दावे केले जातात. गेल्या रविवारी रशियन सैन्याने पोलंडच्या सीमेजवळ असलेल्या युक्रेनच्या यावोरिव्ह शहराला लक्ष्य केले होते.
दरम्यान, राजधानी किव्हच्या जवळ पोहोचलेल्या रशियन सैन्याला युक्रेनी लष्कराच्या प्रतिकारामुळे पुढे सरकता येत नसल्याचे दावे पाश्चिमात्य देश करीत आहेत. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने हे दावे करून युक्रेनी लष्कराची प्रशंसा केली आहे. पाश्चिमात्य माध्यमे देखील युक्रेनी लष्कराच्या जबरदस्त प्रतिकारामुळे रशियन सैन्याची आगेकूच थांबल्याचे सांगत आहेत. मात्र या प्रचारमोहीमेच्या पार्श्वभूमीवर, रशियाने युक्रेनवरील आपले हल्ले अधिकच तीव्र केले असून यामुळे युक्रेनमधील परिस्थिती अधिकच विदारक बनल्याचे दिसत आहे.
युद्धात युक्रेनी लष्कराच्या हाती लागलेल्या काही रशियन सैनिकांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात विधाने केल्याचे व्हिडिओज् पाश्चिमात्य माध्यमांमध्ये दाखविले जात आहेत. आपली सुटका झाली की युक्रेनमधील निष्पाप नागरिकंवर हल्ले चढविण्यासाठी आपल्याला भाग पाडणार्या रशियन राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात जाऊ, असे हे रशियन सैनिक सांगत आहेत. याद्वारे रशियन जनता व सैनिक देखील राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सोबत नसल्याचे दावे पाश्चिमात्य देश व माध्यमे करीत आहेत. पण शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या प्रचाराला छेद देण्याचा प्रयत्न केला.
शुक्रवारी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दोन लाख जणांची रॅली आयोजित करून रशियन जनता आपल्याबरोबरच आहे, हे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जगाला दाखवून दिले. याआधी युक्रेनमधील युद्धाला विरोध करण्यासाठी रशियातील काहीजण रस्त्यावर उतरले होते. त्याचा दाखला देऊन रशियन जनता पुतिन यांच्या विरोधात असल्याचा प्रचार पाश्चिमात्यांनी सुरू केला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |