मॉस्को/किव्ह – युक्रेनमध्ये सुरू असणाऱ्या लष्करी मोहिमेत रशियाने पाणबुडीवरून क्षेपणास्त्र हल्ले चढविले आहेत. ब्लॅक सी सागरी क्षेत्रातील पाणबुडीवरून ‘कॅलिबर’ क्षेपणास्त्रे डागून युक्रेनमधील मोक्याची लष्करी ठिकाणे लक्ष्य करण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. युक्रेन युद्धात रशियाने पाणबुडीचा वापर करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, रशियाने गेल्या 24 तासांमध्ये युक्रेनमध्ये चढविलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनी लष्कराचे 120 जवान मारल्याचा दावा केला आहे.
काही दिवसांपूर्वी रशियाच्या ‘ब्लॅक सी फ्लीट’मधील आघाडीची युद्धनौका ‘मोस्कव्हा’ बुडाल्याचे समोर आले होते. त्यानंतर रशियन नौदलासह संरक्षणदलांचे धैर्य खचल्याचे सांगण्यात येत होते. मात्र पाणबुडीवरून करण्यात आलेला क्षेपणास्त्रहल्ला रशियन नौदल पूर्णपणे सक्रिय असल्याचे संकेत देणारा ठरला आहे. या हल्ल्याने रशियन संरक्षणदले आपल्या पूर्ण क्षमतांसह युक्रेनवर हल्ले करीत असल्याचेही उघड झाल्याचे विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनची राजधानी किव्हमध्येही क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.
दुसऱ्या बाजूला रशियाने डोन्बासच्या आघाडीवरील हल्ले अधिक तीव्र केल्याचे दिसते. ‘डोन्बास व खार्किव्ह प्रांतातील स्थिती अत्यंत अवघड बनली आहे. युक्रेन आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे’, अशा शब्दात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या भागातील संघर्षाकडे लक्ष वेधले. रशियाने पॉपास्ना, क्रॅमाटोर्स्क यासारख्या प्रमुख भागांना लक्ष्य केले असून पुढील काही दिवसात रशिया ताबा मिळवेल, असा दावा करण्यात येतो. रशियन फौजांनी या भागातील युक्रेनचे शस्त्रसाठे तसेच इंधन डेपोंवर मोठे हल्ले चढविल्याचे सांगण्यात येते.
गेल्या 24 तासांमध्ये रशियाने युक्रेनी लष्कराच्या सुमारे 400 जागांना लक्ष्य केल्याची माहिती देण्यात आली. यात युक्रेन लष्कराचे 10 छोटे व मध्यम आकाराचे तळ, 35 कमांड पोस्ट्स, रडार, मल्टिपल रॉकेट लाँच सिस्टिम्स, रणगाडे व ड्रोन्सचा समावेश आहे. 24 तासांच्या अवधीत युक्रेनची 18 ड्रोन्स पाडण्यात आली आहेत व त्यात तुर्कीने दिलेल्या ड्रोन्सचाही समावेश असल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाने स्पष्ट केले. युक्रेनी लष्कराचे 120 जवान हल्ल्यांमध्ये मारले गेल्याचेही सांगण्यात आले. मारिपोलमधील स्टील फॅक्टरीवरही हल्ले सुरू असून त्याचे मोठे नुकसान झाल्याचा दावा माध्यमांनी केला आहे.
दरम्यान, रशिया लवकरच युक्रेनविरोधात ‘ऑल आऊट वॉर’ची घोषणा करेल, असा इशारा ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी दिला. रशिया मे महिन्यात युक्रेनविरोधातील युद्धाची व्याप्ती वाढवेल, असा दावाही वॉलेस यांनी केला. वॉलेस यांच्या दाव्याला नाटोचे माजी प्रमुख रिचर्ड शेरीफ यांनी दुजोरा दिला आहे. पाश्चिमात्य देशांनी वाईटातील वाईट स्थितीसाठी तयार असायला हवे, असे शेरीफ यांनी बजावले. युक्रेनच्या फौजांना युरोपातील विविध भागांमध्ये अमेरिकी संरक्षणदलाकडून प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी दिली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |