मॉस्को/किव्ह – डोन्बास क्षेत्रातील मोक्याचे शहर म्हणून ओळखण्यात येणाऱ्या लिमनवर रशियाने ताबा मिळविला आहे. लिमनवरील ताबा हे रशियन फौजांना या आठवड्यात मिळालेले दुसरे मोठे सामरिक यश असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी रशियाने डोन्बासमधील स्विटलोडार्स्क शहरावरही नियंत्रण मिळविले हेोते. लिमनवर ताबा मिळवितानाच सेव्हेरोडोनेत्स्कला वेढा घातल्याची माहितीही समोर आली आहे. युक्रेनला समर्थन देणाऱ्या पाश्चिमात्य देशांनाही रशियाला मिळणाऱ्या यशाची कबुली देणे भाग पडत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशिया डोन्बास क्षेत्रात मोठी प्रगती करीत असल्याचे वक्तव्य केले आहे.
गेल्या आठवड्यापासून रशियाने डोन्बासची लढाई हा निर्णायक संघर्ष असल्याप्रमाणे हल्ल्यांची तीव्रता व व्याप्ती वाढविली आहे. रशियन तोफा, रणगाडे, रॉकेट सिस्टिम्स, क्षेपणास्त्रे व लढाऊ विमाने डोन्बासमधील शहरांना अक्षरशः भाजून काढत आहेत. काही दिवसांपूर्वी युक्रेनमधील एका वरिष्ट अधिकाऱ्याने रशिया डोन्बासमध्ये ‘स्कॉर्चड् अर्थ पॉलिसी’चा वापर करीत असल्याचा दावा केला होता. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांपासून ते स्थानिक अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच ही बाब मान्य करणे भाग पडले आहे. रशिया-युक्रेन युद्धातील सर्वाधिक तीव्रतेचा व जबरदस्त संघर्ष सध्या डोन्बासमध्ये सुरू आहे आणि त्यात रशियाला यश मिळत असल्याचे गेल्या काही दिवसांमधील घटनांमधून समोर येत आहे.
शुक्रवारी डोन्बासमधील लिमन शहरावर मिळविलेले नियंत्रण त्याला दुजोरा देणारे ठरते. लिमन हे डोन्बास क्षेत्रातील ‘स्ट्रॅटेजिक टाऊन्स’पैकी एक म्हणून ओळखण्यात येते. युक्रेनी लष्करासाठी महत्त्वाचे ‘ट्रान्सपोर्ट व सप्लाय हब’ असणाऱ्या ‘स्लोव्हियान्स्क’पासून लिमन अवघ्या 20 किलोमीटरवर आहे. त्यामुळे लिमनवरील ताब्यानंतर रशिया ‘स्लोव्हियान्स्क’वर नियंत्रणासाठी नव्या दमाने चढाई करेल, असे सांगण्यात येते.
दुसऱ्या बाजूला सेव्हेरोडोनेत्स्क व लिशिचान्स्क या दोन शहरांसाठी रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यांची व्याप्ती अधिकच वाढली आहे. सेव्हेरोडोनेत्स्कला रशियन फौजांनी वेढा घातला असून शहराच्या सीमेवरील काही भाग ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. रशियन लष्कर लिशिचान्स्कमध्ये शिरल्याचेही दावे करण्यात आले असले तरी त्याला दुजोरा मिळालेला नाही. सेव्हेरोडोनेत्स्क रशियाच्या हातात पडल्यास डोन्बासचा भाग असणारा लुहान्स्क प्रांत पूर्णपणे रशियाच्या नियंत्रणाखाली येईल, असे सांगण्यात येते. डोन्बासमधील बाखमत शहरानजिकचा एक डिस्ट्रिक्ट रशियन फौजांनी ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. डोन्बासमधील रशियन फौजांचे आक्रमक हल्ले म्हणजे वंशसंहाराप्रमाणेच असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे.
दरम्यान, रशियाने डोन्बासव्यतिरिक्त उत्तर युक्रेनमधील खार्किव्ह तसेच मध्य युक्रेनमधील डिनिप्रो शहरावरही मोठे हल्ले चढविले आहेत. गेल्या 24 तासात या दोन शहरांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 20हून अधिक जणांचा बळी गेला आहे तर 50हून अधिक जखमी झाले आहेत. डिनिप्रोमध्ये युक्रेनी लष्कराच्या तळाला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. रशियाने दक्षिण युक्रेनमधील लष्करी तळांना लक्ष्य केल्याची माहितीही युक्रेनच्या संरक्षणविभागाने दिली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |