युक्रेन डोन्बासमध्ये दररोज दोनशे जवान गमावत आहे

- युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कबुली

मॉस्को/किव्ह – रशियन लष्कराकडून डोन्बासमध्ये बसणारे दणके युक्रेनला चांगलेच जाणवू लागल्याचे समोर येत आहे. नजिकच्या काळात डोन्बास युक्रेनच्या ताब्यात राहणार नसल्याचे संकेत मिळाल्याने युक्रेनी अधिकारी व यंत्रणांकडून पराभवाची कबुली देणारी वक्तव्ये समोर येऊ लागली आहेत. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे निकटवर्तिय असणाऱ्या मिखायलो पोडोलिआक यांनी, युक्रेन डोन्बासच्या आघाडीवर दरदिवशी जवळपास 200 जवान गमावित असल्याचे सांगितले आहे. सध्या हाती असणाऱ्या स्रोतांच्या बळावर रशिया वर्षभर हे युद्ध चालवू शकतो, असे युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेने बजावले आहे. युक्रेनी अधिकाऱ्यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर रशियन फौजांनी मध्य युक्रेनमध्ये तसेच स्लोव्हिआन्स्क शहरावर नवे हल्ले चढविल्याची माहिती समोर आली आहे.

डोन्बास प्रांतातील मोक्याच्या शहरांपैकी एक असणाऱ्या सेव्हेरोडोनेत्स्क शहरावर रशियन फौजांनी जवळपास पूर्ण ताबा मिळविला आहे. शहराच्या सीमाभागात असलेला औद्योगिक क्षेत्राचा भाग फक्त युक्रेनच्या ताब्यात असून त्यासाठी जोरदार संघर्ष सुरू आहे. सेव्हेरोडोनेत्स्कबरोबरच डोन्बासमधील इतर शहरांवर तसेच दक्षिण व मध्य युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रशियाच्या या हल्ल्यांमुळे होणाऱ्या प्रचंड हानीमुळे युक्रेनी फौजांना माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वीच डोन्बासमध्ये युक्रेनी फौजा दररोज 100 जवान गमावित असल्याचा दावा केला होता. झेलेन्स्की यांचे निकटवर्तिय असणाऱ्या पोडोलिआक यांनी जीवितहानीचा आकडा त्याहून जास्त असल्याची कबुली दिली आहे.

युक्रेनचे लष्कर दररोज जवळपास 200 जवान गमावित असल्याचे पोडोलिआक यांनी सांगितले. रशियाकडून होणारा तोफा, रणगाडे व रॉकट्सचा मारा आणि हवाईहल्ले यामुळे युक्रेनला मोठ्या प्रमाणावर जीवितहानी सहन करावी लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्राध्यक्ष झेलेनस्की यांच्या निकटवर्तियांपाठोपाठ युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेनेही रशियन सामर्थ्याबाबत कबुली देणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे. रशियाकडे सध्या असलेल्या आर्थिक स्रोतांचा विचार करता रशियन नेतृत्त्व युक्रेनमध्ये अजून वर्षभर युद्ध सुरू ठेऊ शकते, असे युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेने बजावले. रशियन नेतृत्त्व कदाचित काही काळासाठी युद्ध थांबवित असल्याचे दाखवेल पण त्यांचे हल्ले पुढे सुरूच राहतील, असे युक्रेनी यंत्रणेने म्हटले आहे.

दरम्यान, रशियाने मध्य युक्रेनमधील क्रिव्हि रिव्ह शहरावर जोरदार हल्ले चढविले आहेत. गेले काही दिवस सातत्याने या भागात हल्ले सुरू असल्याची माहिती युक्रेनी सूत्रांनी दिली. त्याचवेळी डोन्बासमधील स्लोव्हिआन्स्क शहरासाठी रशियन लष्कराने आगेकूच सुरू केली आहे. शहराच्या उत्तर तसेच पश्चिमेकडील भागातून रशियन तुकड्या पुढे येत असून शहराच्या नजिक हल्ल्यांना सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते. या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर डोनेत्स्कमधील न्यायालयाने युक्रेनकडून युद्धात सामील झालेल्या तीन परदेशी जवानांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. यात दोन ब्रिटीश व एका मोरोक्कन नागरिकाचा समावेश आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info