मॉस्को/किव्ह – डोन्बास क्षेत्रातील लष्करी मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी खार्किव्ह प्रांतातील काही भागांमधून अंशतः माघार घेण्यात आल्याचा खुलासा रशियाच्या संरक्षण विभागाकडून करण्यात आला. गेल्या काही दिवसात ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह प्रांतात युक्रेनी फौजांना मोठे सामरिक यश मिळाल्याचे दावे प्रसिद्ध होत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना रशियाच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी, लष्करी तैनातीची फेररचना करण्यात आल्याची माहिती दिली. त्याचवेळी गेल्या 48 तासांमध्ये रशियाने खार्किव्ह भागात ‘प्रिसिजन स्ट्राईक्स’ तसेच आर्टिलरीच्या सहाय्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये 750हून अधिक युक्रेनी जवान मारले गेल्याचेही सांगितले.
युक्रेनच्या लष्कराने गेल्या महिन्यापासून रशियाच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या दक्षिण तसेच ईशान्य युक्रेनमधील क्षेत्रात प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये त्याला यश मिळत असल्याचे समोर येत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, वरिष्ठ नेते तसेच पाश्चिमात्य माध्यमांनी याबाबतचे मोठमोठे दावे प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी खार्किव्हमधून रशियन फौजा पाठ दाखवून पळ काढत असल्याचा दावा करीत जवळपास 30हून अधिक मोठे भाग ताब्यात घेतल्याचे सांगितले. ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांनीही याला दुजोरा दिला असून पाश्चिमात्य माध्यमांनी रशियन सैन्याची आघाडी कोसळल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. राजधानी किव्हमधील माघारीनंतर हा रशियाचा मोठा पराजय असल्याचेही दावे करण्यात येत आहेत.
युक्रेन व पाश्चिमात्य माध्यमांकडून सुरू असणाऱ्या या प्रचाराच्या पार्श्वभूमीवरच रशियाच्या संरक्षण विभागाने खार्किव्हमधील स्थितीबद्दल खुलासा करणारे निवेदन दिले. ‘खार्किव्हमधील इझियम व बॅलाकिलिआ शहरांमध्ये तैनात करण्यात आलेल्या लष्करी पथकांची फेररचना करण्यात येत आहे. डोन्बास क्षेत्राच्या मुक्ततेची उद्दिष्टे पूर्ण व्हावीत यासाठी डोनेत्स्कमधील लष्करी तैनाती बळकट करण्यात येत आहे. त्यासाठी इझियम व बॅलाकिलिआमधील पथके या भागात तैनात करण्यात येत आहेत’, अशी माहिती रशियाच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी दिली. यावेळी रशियन प्रवक्त्यांनी खार्किव्हमधील हल्ले थांबविण्यात आलेले नसून दक्षिण युक्रेनमधील युक्रेनी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
गेल्या 48 तासांमध्ये रशियाचे हवाईदल, मिसाईल फोर्सेस व आर्टिलरी पथकांनी खार्किव्हमधील युक्रेनी लष्कराची पथके तसेच तळांवर जोरदार हल्ले चढविले आहेत. या हल्ल्यांमध्ये 750हून अधिक युक्रेनी जवानांचा बळी गेला आहे. युक्रेनी लष्कराची ड्रोन्स, रडार्स, तोफा तसेच कमांड पोस्ट्स यात उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. अमेरिकेने पुरविलेली सशस्त्र वाहने तसेच हायमार्स रॉकेट्सही नष्ट करण्यात आल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह भागातही हल्ले करण्यात आल्याची माहिती रशियाने दिली.
दरम्यान, झ्ॉपोरिझ्ािआ भागातील अणुप्रकल्पावर झ्ाालेल्या हल्ल्यांमुळे या प्रकल्पातील सर्व युनिट्स बंद करण्यात आली असून वीजेची निर्मिती तसेच पुरवठा थांबल्याचे वृत्त देण्यात आले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |