मॉस्को – रशियाचे नियंत्रण असलेल्या युक्रेनच्या चार प्रांतांनी रशियात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. डोन्बास क्षेत्राचा भाग असलेल्या लुहान्स्क व डोनेत्स्कसह खेर्सन तसेच झॅपोरिझिआमध्ये गेल्या आठवड्यात मतदानाला सुरुवात झाली होती. त्याचे निकाल घोषित झाले असून 85 टक्क्यांहून अधिक मतदारांनी रशियात सहभागी होण्याच्या बाजूने कौल दिल्याचे रशियन यंत्रणांनी जाहीर केले. त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, या चारही प्रांतातील जनतेची सुरक्षा ही रशियाची जबाबदारी असून पुढील काळात त्याला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. पाश्चिमात्य देशांनी सार्वमताची प्रक्रिया नाकारली असून युक्रेन आपल्या क्षेत्रातील जनतेच्या सुरक्षेची काळजी घेईल, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी बजावले आहे.
सात महिन्यांपूर्वी युक्रेनमध्ये लष्करी मोहीम सुरू करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी डोन्बास प्रांतासह युक्रेनच्या इतर भागांमधील रशियन मूळ असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. युक्रेनची राजवट रशियन भाषिक जनतेवर अत्याचार करीत असून त्यांच्या सुरक्षेसाठी रशियाला लष्करी कारवाईचे पाऊल उचलावे लागले, असे पुतिन यांनी सांगितले होते. सात महिन्यात रशियाने डोन्बासमधील लुहान्स्क प्रांतावर पूर्ण ताबा मिळविला आहे. तर डोनेत्स्कसह दक्षिण युक्रेनमधील खेर्सन व झॅपोरिझिआ प्रांतातील 70 टक्क्यांहून अधिक भाग रशियाच्या नियंत्रणाखाली आहे. युक्रेनने हे भाग पुन्हा ताब्यात मिळविण्यासाठी गेल्या महिन्यापासून प्रतिहल्ल्यांची मोहीम सुरू केली होती. त्याला ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह प्रांतात यश मिळाले असले तरी इतर प्रांतांमध्ये फारसा प्रभाव पडलेला नाही.
या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सार्वमत घेण्याची घोषणा करून त्याच्या निकालानुसार, पुढील पावले उचलली जातील असे सांगितले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात तातडीने कडक सुरक्षाव्यवस्थेत सार्वमत प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया उधळण्यासाठी युक्रेनने या भागातील हल्ल्यांची तीव्रता वाढविण्याचाही प्रयत्न केला होता. पण त्याला यश मिळाले नाही. बुधवारी रशियाने सार्वमताचे निकाल घोषित करून, चारही प्रांतांनी रशियात सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. खेर्सन प्रांतात 78 टक्के तर डोनेत्स्कमधील तब्बल 97 टक्के जनतेने मतदान केल्याचा दावा रशियाने केला. खेर्सनमधील 87 टक्के मतदारांनी रशियात सहभागी होण्याचा कौल दिला तर लुहान्स्क व डोनेत्स्कसह झॅपोरिझिआमध्ये 90 टक्क्यांहून अधिक मतदारांनी रशियात सामील होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रशियाकडून देण्यात आली.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासह पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या सार्वमतावर तीव्र टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी लवकरच रशियाच्या ताब्यातील सर्व भाग मुक्त करण्याचा इशारा दिला. तर युरोपिय महासंघाने नवे निर्बंध लादले जातील, असे म्हटले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |