‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनगळती झालेल्या भागावर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचे नियंत्रण

- रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचा गंभीर आरोप

ब्रुसेल्स/मॉस्को – रशिया व युरोपिय देशांमध्ये उभारण्यात आलेल्या ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीतून दोन दिवसांपूर्वी झालेल्या इंधनगळतीमागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप रशियाच्या परराष्ट्र विभागाने केला आहे. परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मारिआ झाखारोव्हा यांनी, गळती झालेला भाग स्वीडन व डेन्मार्कच्या अखत्यारितील असून या देशांवर अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे नियंत्रण असल्याचा ठपका ठेवला. तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, नॉर्ड स्ट्रीममधील गळतीची घटना घातपाताचा प्रकार असून यातून युद्धाचा भडका उडू शकतो, असा इशारा दिला. दरम्यान, बाल्टिक क्षेत्रात झालेल्या इंधनगळतीच्या पार्श्वभूमीवर नॉर्वेने आपल्या इंधनक्षेत्रात लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी डेन्मार्कचा भाग असलेल्या ‘बॉर्नहोम आयलंड’जवळच्या सागरी क्षेत्रात ‘नॉर्ड स्ट्रीम २’ इंधनवाहिनीत गळतीची पहिली घटना उघडकीस आली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसात इंधनवाहिनीत चार ठिकाणी गळती झाल्याचे समोर आले आहे. या गळतीमुळे सदर क्षेत्रातील सागरी पृष्ठभागावर ‘गॅस बबल्स’ दिसण्यास सुरुवात झाली असून काही भागांमध्ये स्फोटाचे आवाजही आले आहेत. त्यामुळे स्वीडन व डेन्मार्कसह युरोपिय देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील सागरी वाहतुकीसह सागरी क्षेत्रात असणाऱ्या विविध पायाभूत सुविधांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नाटोने सदस्य देशांशी चर्चा सुरू केली असून सागरी क्षेत्रातील तैनाती तसेच टेहळणी वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

‘नॉर्ड स्ट्रीम’

या गळतीप्रकरणी नाटो व युरोपिय महासंघाने रशियावर ठपका ठेवला होता. बाल्टिक सागरी क्षेत्रात रशियाची संरक्षणतैनाती मोठ्या प्रमाणात असून रशियानेच हा घातपात घडविला असल्याचा आरोप महासंघाच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी केला होता. नाटोचे प्रमुख स्टॉल्टनबर्ग यांनीही त्याला दुजोरा देऊन नाटो रशियाच्या कारवायांना प्रत्युत्तर देईल, असे बजावले होतेे. मात्र रशियाने आपल्यावरील आरोप फेटाळले असून ‘नॉर्ड स्ट्रीम’ला नुकसान झाल्यास सर्वाधिक फटका रशियालाच बसेल, याकडे लक्ष वेधले होते.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा घातपात झालेले भाग नाटो सदस्य देशांचे असून त्यांच्यावर अमेरिकेचे नियंत्रण असल्याचा ठपका ठेवला. युरोपने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे ठरविले तर त्यात संशयित म्हणून अमेरिकेचाही समावेश करावा, अशी मागणीही रशियाने केली.

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॉर्ड स्ट्रीममधील घातपात युद्धाचा भडका उडविणारा ठरु शकतो, असा दावा केला आहे. घातपाताची घटना चिथावणी देणारी असून त्यातून संघर्षाला तोंड फुटेल, अशी चिंता ट्रम्प यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. आपण राष्ट्राध्यक्ष असताना या इंधनवाहिनीच्या धोक्यांकडे लक्ष वेधले होते, असेही त्यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे.

‘नॉर्ड स्ट्रीम १’ ही रशियाकडून युरोपला इंधनवायूचा पुरवठा करणारी मुख्य इंधनवाहिनी आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून या इंधनवाहिनीतून होणारा पुरवठा बंद करण्यात आला आहे. युरोपिय देशांनी निर्बंध उठविले तरच पुरवठा सुरू करु, अशी आक्रमक भूमिका रशियाने घेतली आहे. ‘नॉर्ड स्ट्रीम २’ इंधनवाहिनी बांधून तयार असली तरी नव्या जर्मन सरकारने परवानगी नाकारल्याने त्यातून पुरवठा सुरू झालेलाच नाही. इंधनपुरवठा बंद असतानाही इंधनवायूची गळती होण्याची घटना घडल्याने त्याबाबतचे गूढ अधिकच वाढले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info