मॉस्को – रशियन लष्कराच्या ताब्यात असलेले लुहान्स्क, डोनेत्स्क, खेर्सन आणि झॅपोरिझिआ हे युक्रेनचे चार प्रांत आता रशियन संघराज्याचा भाग बनल्याची घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केली. 2014 साली झालेल्या युद्धात रशियाने युक्रेनच्या क्रिमिआ प्रांताचा ताबा घेऊन हा भूभाग रशियाला जोडून टाकला होता. रशियाकडून क्रिमिआ परत मिळविण्याची घोषणा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केली होती. मात्र युक्रेनपासून आणखी चार प्रांत तोडून रशियाने जगभरात खळबळ माजविली आहे. या चारही प्रांतात सार्वमत घेण्यात आले असून इथल्या जनतेनेच रशियात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता हा रशियाचा भूभाग बनला असून रशिया याच्या रक्षणासाठी कुठल्याही टोकाचा निर्णय घेईल, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले आहे.
लुहान्स्क, डोनेत्स्क, खेर्सन आणि झॅपोरिझिआमध्ये रशियाने सार्वमताची घोषणा केल्यानंतर, हे प्रांत युक्रेनपासून तोडण्याची तयारी या देशाने केल्याची चर्चा सुरू झाली होती. अमेरिका व युरोपिय देशांनी रशियाच्या या हालचालींना कडाडून विरोध केला होता. त्याची पर्वा न करता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शुक्रवारी हे चारही प्रांत रशियन संघराज्याचा भाग बनल्याचे जाहीर केले. तसेच आपल्या भूभागाच्या रक्षणासाठी रशिया कुठल्याही टोकाचा निर्णय घेऊ शकेल, असे सांगून पुन्हा एकदा रशियन राष्ट्राध्यक्षांनी या प्रांतांवरील हल्ल्यामुळे अणुयुद्ध पेट घेऊ शकेल, असे संकेत दिले. यापुढे युक्रेनने त्वरित युद्ध थांबवून रशियाबरोबर चर्चा सुरू करावी, असा इशाराही रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे. तसेच यावेळी केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांवर घणाघाती टीका करून हे देश आपले वर्चस्व जगावर लादत असल्याचा ठपका ठेवला.
अणुहल्ला चढविणारा एकमेव देश अशा शब्दात अमेरिकेची निर्भत्सना करून रशियन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेने आजवर केलेल्या गुन्ह्यांचा पाढाच यावेळी वाचला. अमेरिका व पाश्चिमात्यांना कुठल्याही देशाचे सार्वभौमत्त्व मान्य नाही. आपले वर्चस्व जगावर लादण्यासाठी पाश्चिमात्य वसाहतवादी कुठल्याही थराला जाऊ शकतात. जे देश अमेरिकेला विरोध करतात, त्यांना धमक्या देऊन त्यांचे धोरण बदलण्यास भाग पाडले जाते किंवा अशा देशांना नेस्तनाबूत केले जाते. चीनच्या जनतेला अफूचे व्यसन लावून त्यापासून आपले उखळ पांढरे करणारे पाश्चिमात्य वसाहतवादी आपले गुन्हे मान्य करायला तयार नाहीत. या वसाहतवाद्यांनी भारतासारख्या देशाची लूटमार केली. पण रशिया कधीही या देशांची वसाहत बनला नाही. मात्र पुढच्या काळात या यादीत रशियाचे नाव असू शकते, असा दावा पुतिन यांनी केला.
पण काहीही झाले तरी आपले सार्वभौमत्त्व आणि स्वाभिमान याच्याशी तडजोड करायला रशिया तयार नाही. रशिया आपली परंपरागत मुल्य व संस्कृती यांच्याशी प्रतारणा करणार नाही. माझा रशियाच्या आत्मशक्तीवर पूर्ण विश्वास आहे, असे सांगून रशिया सर्वशक्तीनिशी अमेरिका व पाश्चिमात्यांविरोधात लढा देईल, अशी गर्जना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केली. अमेरिका व पाश्चिमात्य विकृतीचा पुरस्कार करीत असून सुसंस्कृत रशियन जनता ते कधीही खपवून घेणार नाही.
पाश्चिमात्यांची ही धोरणे केवळ रशियाच्याच विरोधात नसून त्यामुळे पाश्चिमात्य देशांच्या जनतेचीही हानी होत आहे. याला विरोध करणाऱ्या रशियाला इतर देशांकडून मिळणारा पाठिंबा वाढत चालला आहे. खुद्द अमेरिकेतूनही रशियाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, याची जाणीव आपल्याला झाल्याचे व्लादिमिर पुतिन यावेळी म्हणाले. त्यांच्या या भाषणाचे जबरदस्त पडसाद उमटले असून पुतिन यांचे हे भाषण केवळ रशियन जनतेलाच नाही, तर जगभरातील अमेरिका व पाश्चिमात्य देशांच्या विरोधकांना चिथावणी देण्यासाठी असल्याचा दावा युरोपिय देशांमधील विश्लेषक करीत आहेत.
लॅटिन अमेरिकन, आखाती देशांबरोबरच चीन व भारतालाही राष्ट्राध्यक्ष पुतिन संदेश देत असल्याचा दावा या युरोपियन विश्लेषकांनी केला. तसेच त्याचा प्रभाव पुढच्या काळात दिसू शकेल, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. दरम्यान, युक्रेनच्या युद्धाचे पारडे फिरले असून सध्या युक्रेनच्या लष्कराने रशियाविरोधात मुसंडी मारल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत आपल्या लष्कराची पिछेहाट लपविण्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनचे चार प्रांत तोडून आपला विजय झाल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा पाश्चिमात्य माध्यमांनी सुरू केली आहे. पण रशियाने निर्धारित केलेली उद्दिष्टे साध्य झाल्याखेरीज युक्रेनमधून माघार घेणार नाही, असे रशियाने या आधीच जाहीर केले होते.
युक्रेनच्या चार प्रांतांमधील जनता रशियासमर्थक असून त्यांच्यावर युक्रेनच्या सरकारकडून सातत्याने अन्याय होत आहे, हे देखील रशियाने वेळोवेळी बजावले होते. त्यामुळे युक्रेनचे लुहान्स्क, डोनेत्स्क, खेर्सन आणि झॅपोरिझिआ हे प्रांत ताब्यात घेणे हेच रशियाचे प्रमुख उद्दिष्ट होते, याची जाणीव काही सामरिक विश्लेषकांनी करून दिली होती. त्यानुसार रशियाने लुहान्स्क, डोनेत्स्क, खेर्सन आणि झॅपोरिझिआ युक्रेनपासून तोडण्याची तयारी फार आधीच केल्याचे उघड होत आहे. हे प्रांत रशियाचा भूभाग बनल्यानंतर, यांच्यावरील हल्ला हा रशियावरील हल्ला मानला जाईल, असे रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव्ह यांनी बजावले होते. या भूभागाच्या रक्षणासाठी रशिया अणुहल्ला चढवितानाही कचरणार नाही, याचीही जाणीव मेदवेदेव्ह यांनी करून दिली होती. त्यामुळे या युद्धात युक्रेनच्या मागे उभे राहणारे अमेरिका व नाटो पुढच्या काळात काय करील, याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |