ब्रुसेल्स – रशियाने दिलेल्या इशाऱ्यानंतरही नाटोने पुढच्या आठवड्यात ‘न्यूक्लिअर एर्क्ससाईझ’ अर्थात अणुहल्ल्याचा सराव करण्याची घोषणा केली. हा सराव युक्रेनचे युद्ध सुरू होण्याच्या आधीच ठरले होते, अशी माहिती नाटोचे प्रमुख स्टोल्टनबर्ग यांनी दिली. आत्ताच्या काळात हा युद्धसराव रद्द केला, तर त्यातून अतिशय चुकीचे संदेश जातील. यामुळे आपल्या सदस्यदेशांच्या रक्षणाचे सामर्थ्य व इच्छाशक्ती नाटोकडे नाही, असे रशियाला वाटू शकते. याने रशियाची आक्रमकता अधिकच वाढून परिस्थिती चिघळू शकते. म्हणूनच रशियाला चुकीचे आडाखे बांधण्याची संधी न देता, हा नियोजित सराव पार पाडणे आवश्यक ठरते, असा खुलासा स्टोल्टनबर्ग यांनी दिला आहे.
आपल्या संरक्षणासाठी रशिया अणुहल्ला चढवू शकतो आणि रशियाने दिलेली ही धमकी पोकळ नाही, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बजावले होते. त्यानंतर अमेरिका व नाटोने रशियाने युक्रेनवर अणुहल्ला चढविल्यास, त्याचे भयंकर परिणाम सहन करावे लागतील, असा इशारा दिला होता. अमेरिकेच्या सीआयएच्या माजी प्रमुखांनी युक्रेन नाटोचा सदस्यदेश नसला, तरीही अमेरिका-नाटो युक्रेनवरील अणुहल्ल्याची जबर किंमत मोजण्यास रशियाला भाग पाडेल, असे धमकावले होते. अशा परिस्थितीत रशियाने दिलेल्या इशाऱ्यानंतरही, नाटोने युद्धसरावाचे आयोजन केले आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या या युद्धसरावात अणुहल्ला चढविण्याची क्षमता असलेल्या लढाऊ विमानांचा सहभाग असेल. हा सराव रशियाच्या सीमेपासून सुमारे हजार किलोमीटर अंतरावर पार पडेल. यात लाईव्ह बॉम्बचा वापर केला जाणार नाही, अशी माहिती नाटोने दिली आहे.
तरीही नाटोच्या या सरावाचे फार मोठे पडसाद या क्षेत्रात उमटू शकतात. मात्र युक्रेनचे युद्ध सुरू असले तरीही नाटो हा युद्धसराव रद्द करणार नाही. कारण यातून रशियाला अतिशय चुकीचा संदेश मिळेल आणि नाटोने रशियासमोर माघार घेतल्याचे चित्र उभे राहू शकते, असा दावा नाटोकडून केला जात आहे. मात्र याला दुसरी बाजू असून नाटो या युद्धसरावाद्वारे आपल्याला थेट आव्हान देत असल्याचा दावा रशियाकडून केला जात आहे. त्याचवेळी युक्रेनबरोबरील युद्धात नाटोचा सहभाग यामुळे उघड होत असल्याची घणाघाती टीका रशियन नेते करू लागले आहेत.
नाटोचे प्रमुख स्टोल्टनबर्ग यांनी युक्रेनच्या युद्धात रशियाचा विजय याचा अर्थ नाटोचा पराभव असा होतो, असे सांगून या युद्धातील नाटोची भूमिका स्पष्ट केली. उघडपणे नाटोने युक्रेनच्या बाजूने या युद्धात उतरण्याचा निर्णय घेतलेला नसला, तरीही नाटो युक्रेनच्या लष्कराला शक्य तितके सहाय्य पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे. अमेरिका व नाटोने आत्तापर्यंत केलेल्या सहाय्यामुळेच युक्रेनी लष्कराला रशियन सैन्याला मागे ढकलण्यात यश मिळाले होते. पुढच्या काळात नाटोच्या सदस्यदेशांनी युक्रेनला अधिक प्रमाणात लष्करी सहकार्य करण्याची मागणी वाढत चालली आहे.
विशेषतः रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा जबरदस्त मारा सुरू केल्यानंतर, अमेरिका व नाटोने आपल्याला हवाई सुरक्षा यंत्रणा पुरवावी, अशी मागणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केली होती. त्याला अमेरिका व नाटोकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. यामुळे युक्रेनच्या युद्धात आपल्या सैन्याची लवकरच अमेरिका व नाटोच्या लष्कराशी टक्कर होईल, ही रशियाने वर्तविलेली शक्यता प्रत्यक्षात उतरू लागल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत पुढच्या आठवड्यात नाटोने आयोजित केलेला युद्धसराव रशियाला चिथावणी देणारा ठरतो. याला प्रत्युत्तर दिल्याखेरीज रशिया स्वस्थ बसणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |