मॉस्को/वॉशिंग्टन – जगातील पाच अण्वस्त्रसज्ज महासत्ता थेट संघर्षाच्या उंबरठ्यावर असून अशा संघर्षाचे भयावह व विनाशकारी परिणाम होऊ शकतात, असा गंभीर इशारा रशियाने दिला. जागतिक महासत्तांमध्ये अणुयुद्ध टाळणे हा रशियासाठी प्राधान्यक्रम आहे, मात्र पाश्चिमात्य देश सर्वसंहारक शस्त्रांची तैनाती करून चिथावणी देत असल्याचा आरोप रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. तर अणुयुद्धाची शक्यता वाढविण्यासाठी रशियाची वक्तव्ये व कृती जबाबदार असल्याचे दावे पाश्चिमात्य देश करीत आहेत. गेल्याच महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेन संघर्षात अण्वस्त्र वापरण्याची गरज भासणार नाही, असे वक्तव्य केले होते.
पाकिस्तान युक्रेनला अणुबॉम्बचे तंत्रज्ञान पुरविण्याची तयारी करीत असल्याचा गंभीर आरोप रशियाच्या ‘डिफेन्स कमिटी’चे सदस्य इगोर मोरोझोव्ह यांनी नुकताच केला होता. युक्रेनच्या संशोधकांनी यासाठी पाकिस्तानला भेट दिली होती, अशी माहितीही मोरोझोव्ह यांनी रशियन माध्यमांना दिली होती. अमेरिकेच्या इशाऱ्यावरून पाकिस्तान हे काम करीत असल्याची दाट शक्यता आहे. त्यापूर्वी रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी युक्रेन ‘डर्टी बॉम्ब’ तयार करीत असल्याचा इशाराही दिला होता. त्याचवेळी अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांनी, रशियाच अणुयुद्धाची शक्यता वाढविणारी वक्तव्ये व कारवाया करीत असल्याचा ठपका ठेवला होता.
पाश्चिमात्यांच्या या दाव्यांना रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्युत्तर दिले. ‘या वर्षाच्या सुरुवातीला पाच अण्वस्त्रसज्ज देशांनी अणुयुद्ध टाळण्यासंदर्भात संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले होते. संयुक्त निवेदनातील शब्दांशी रशिया बांधील आहे. रशियाने अण्वस्त्रांच्या वापराबाबतची आपली भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. सर्वसंहारक शस्त्रांचा वापर झाल्यास त्याविरोधात बचाव म्हणून तसेच पारंपारिक शस्त्रांमुळे रशियाच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाला तरच रशिया अण्वस्त्रांचा वापर करेल’, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले. ‘रशियाप्रमाणेच न्यूक्लिअर फाईव्हचा भाग असलेल्या इतर देशांनीही परस्परांच्या हितसंबंधांमध्ये हस्तक्षेप करणे टाळावे. संयुक्त निवेदनातील शब्दांशी वचनबद्ध असण्याची जबाबदारी इतर देशांनीही दाखवायला हवी. पाश्चिमात्य देशांनी सर्वसंहारक शस्त्रांच्या तैनातीसह चिथावणी देणे थांबवायला हवे. तसे झाले नाही तर अण्वस्त्रसज्ज देश थेट संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचतील. अणुयुद्ध झाल्यास त्याचे भयावह व विनाशकारी परिणाम होतील’, असा इशारा रशियाने दिला.
रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे दुर्लक्ष करून काही देश बेजबाबदार पावले उचलत आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होत चालली आहे. अशा स्थितीत अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये लष्करी संघर्षाचा भडका उडण्यापासून रोखण्यास सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे, याची जाणीवही रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने करून दिली.
दरम्यान, रशियाने शेजारी देश असणाऱ्या बेलारुसमध्ये ‘मिग-३१के’ ही सुपरसॉनिक लढाऊ विमाने व ‘किन्झाल हायपरसोनिक मिसाईल्स’ तैनात केल्याचे उघड झाले. पाश्चिमात्य माध्यमांनी सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध करीत हे दावे केले आहेत. रशियाची ही नवी तैनाती युक्रेनसह पाश्चिमात्य देशांना दिलेला संदेश असल्याचा दावा काही विश्लेषकांनी केला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |