मॉस्को/किव्ह – युक्रेनच्या खेर्सन प्रांतात रशिया व युक्रेनच्या फौजांमध्ये सुरू असलेला संघर्ष दुसऱ्या महायुद्धातील ‘बॅटल ऑफ स्टॅलिनग्रॅड’ची पुनरावृत्ती ठरु शकते, असा इशारा सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांनी दिला. खेर्सनसाठी सुरू असलेली लढाई हा रशिया-युक्रेन युद्धातील निर्णायक संघर्ष ठरेल, असेही वुकिक यांनी यावेळी बजावले. सर्बियन राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य प्रसिद्ध होत असतानाच खेर्सनमधील संघर्षात युक्रेनी तुकड्यांना रशियाकडून जबर प्रत्युत्तर मिळत असल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमांकडून करण्यात आला आहे.
रशियाने फेब्रुवारी महिन्यात युक्रेनविरोधात लष्करी मोहीम सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच खेर्सन शहरासह प्रांतातील बहुतांश भागावर ताबा मिळविला होता. त्यामुळे खेर्सन शहर व प्रांत रशियाच्या युक्रेन मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. युक्रेनने काही महिन्यांपूर्वी प्रतिहल्ल्यांची मोहीम हाती घेतानाही खेर्सन प्रांतालाच लक्ष्य केले होते. मात्र सुरुवातीच्या यशानंतर युक्रेनी मोहीम फारशी पुढे सरकली नव्हती. पण गेल्या काही आठवड्यात युक्रेनी लष्कराने खेर्सन शहरासह प्रांतातील अधिकाधिक भाग ताब्यात घेण्यासाठी नव्याने हल्ले चढविले आहेत.
युक्रेनच्या या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियानेही प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. खेर्सन शहरातील बहुतांश नागरिकांना सुरक्षित भागात स्थलांतरित करण्यात आले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या प्रक्रियेसाठी पुढाकार घेतल्याचे समोर आले होते. दुसऱ्या बाजूला रशियाने राबविलेल्या नव्या लष्करी भरती प्रक्रियेतील प्रशिक्षण घेतलेल्या तुकड्या खेर्सनमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. रशियाने खेर्सनसाठी नव्या तोफा, रणगाडे, सशस्त्र वाहने, रॉकेट लाँचर्सही तैनात केल्याचे सांगण्यात येते. या नव्या तैनातीच्या बळावर रशियाने युक्रेनी हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी भक्कम आघाडी तयार केल्याची माहिती रशियन माध्यमे तसेच सोशल मीडियातून उघड झाली आहे.
रशियाच्या या तयारीला यश मिळत असून युक्रेनी फौजांना खेर्सनमध्ये नवे यश मिळविता आलेले नाही. उलट हल्ला चढविणाऱ्या युक्रेनी तुकड्यांना जबर रशियन प्रतिकाराचा सामना करावा लागत असून प्रखर संघर्ष सुरू असल्याचे दावे पाश्चिमात्य माध्यमांमधून करण्यात येत आहेत. युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडूनही रशियाने खेर्सनमध्ये युक्रेनी लष्करासाठी ‘ट्रॅप’ रचल्याचे इशारे देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्बियन राष्ट्राध्यक्षांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.
‘येणारा काळ अधिक खडतर असणार आहे. सध्याच्या हिवाळ्यापेक्षा पुढील हिवाळा अधिक वेदनादायी असू शकतो. लवकरच आपल्याला स्टॅलिनग्रॅडची लढाई पहायला मिळू शकते. खेर्सनमधील लढाई ही युक्रेन युद्धातील निर्णायक लढाई असेल. युक्रेन व त्याला शस्त्रपुरवठा करणाऱ्या पाश्चिमात्य देशांना या संघर्षाच्या माध्यमातून रशियाची हानी घडवायची आहे. तर युद्धाच्या सुरुवातीला जे काही मिळविले त्याचा बचाव करून युद्धाची अखेर करायचे रशियाचे इरादे आहेत. खेर्सनमधील संघर्षाचे इतर भागांमध्येही मोठे पडसाद उमटणार आहेत’, असे सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांनी बजावले.
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीतील नाझी फौजांनी रशियातील स्टॅलिनग्रॅड शहरावर ताबा मिळविण्यासाठी १९४२ सालच्या ऑगस्ट महिन्यात आक्रमण केले होते. सुरुवातीच्या काळात पिछाडीवर गेल्यानंतर रशियाच्या ‘रेड आर्मी’ने नोव्हेंबरमध्ये प्रतिहल्ले चढविले. या प्रतिहल्ल्यांमुळे जर्मन नाझी फौजांना माघार घ्यावी लागली होती. दुसऱ्या महायुद्धात जर्मन लष्कराला घ्यावी लागलेली ही पहिली मोठी माघार ठरली होती.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष रशियाबरोबर चर्चा करण्यास तयार
किव्ह – अमेरिकेकडून दडपण आणले जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतानाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाबरोबर चर्चा करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले आहे. रशिया खरोखरच शांततेसाठी वाटाघाटी करण्यास तयार असेल तरच युक्रेनला या चर्चेत रस आहे, असे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले. मात्र रशियाबरोबरील चर्चेसाठी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी काही अटी घातल्याचे समोर आले असून त्यात रशियाने युक्रेनमधील सर्व भागांचा ताबा सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र रशियाने युक्रेनमध्ये ताबा मिळविलेला भाग सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.
रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत चालल्याचे संकेत मिळत आहेत. युक्रेनकडून थेट क्रिमिआचा ताबा मिळविण्याच्या वल्गना करण्यात येत असल्या तरी पाश्चिमात्य देशांनी ही बाब शक्य नसल्याचे वारंवार बजावले आहे. पाश्चिमात्य आघाडीतील युरोपिय देशांमध्येही युक्रेनला पुरविण्यात येणाऱ्या सहाय्यावरून मतभेद समोर आले असून काही देशांनी पुढील काळात सहाय्य करणे शक्य नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुढील काळात युक्रेनला रशियाविरोधातील संघर्षाची व्याप्ती व तीव्रता कायम ठेवता येणार नाही, असे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी युक्रेनवर दबाव आणण्यास सुरुवात केली असून झेलेन्स्की यांच्या वक्तव्यातून ते दबावापुढे झुकल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |