खेर्सनमधील रशियन हल्ल्यांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढेल

- युक्रेनच्या लष्कराचा इशारा

रशियन हल्ल्यांची तीव्रता

किव्ह/मॉस्को/अंकारा – खेर्सन शहरासह प्रांतातील काही भाग मुक्त केला असला तरी या क्षेत्रात असलेला धोका अजूनही कायम असून रशिया हल्ल्यांची तीव्रता वाढवू शकतो, असा इशारा युक्रेनच्या लष्कराने दिला. सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, रशियाने माघार घेतलेल्या खेर्सन शहराला भेट दिली. या भेटीच्या पार्श्वभूमीवरच युक्रेनी लष्कराने हल्ल्यांचा इशारा देणे लक्ष वेधून घेणारे ठरते. दरम्यान, तुर्कीत रशिया व अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखांची बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या आठवड्यात दक्षिण युक्रेनमधील मोक्याचे शहर असलेल्या खेर्सनमधून रशियन लष्कराने माघार घेतली होती. लष्करी तुकड्यांची फेररचना व मनुष्यहानी टाळणे या दोन उद्देशांनी ही माघार घेतल्याचे रशियाकडून सांगण्यात आले होते. खेर्सन प्रांतातून वाहणाऱ्या डिनिप्रो नदीच्या एका भागातून ही माघार घेण्यात आली. माघार घेत असतानाच रशियाने नदीच्या दुसऱ्या बाजूला भक्कम मोर्चेबांधणी केल्याचे समोर येत आहे. त्यापाठोपाठ युक्रेनी लष्कराने ताब्यात घेतलेल्या खेर्सनमधील इतर भागांमध्ये रशियाने टेहळणी सुरू केली असून या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र व हवाईहल्ले होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रशियन हल्ल्यांची तीव्रता

युक्रेनच्या लष्कराने दिलेला इशाराही याला दुजोरा देणारा ठरतो. ‘रशियन संरक्षणदले पुढील काळात लष्करी तसेच नागरी क्षेत्रांनाही लक्ष्य करतील. खेर्सनमधील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरुंगही पेरण्यात आले असून त्याचाही धोका टळलेला नाही’, असा इशारा युक्रेनी लष्कराने दिला. रशियन लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीतही डोनेत्स्क प्रांतासह खेर्सनमधील हल्ले सुरू असल्याचे सांगण्यात आले. युक्रेनी लष्कराच्या अनेक कमांड पोस्टसह तळांवरही हल्ले केल्याचे रशियाने म्हटले आहे.

रशियन हल्ल्यांची तीव्रता

खेर्सन शहराला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिलेल्या भेटीवर रशियाने वक्तव्य केल आहे. ‘खेर्सन हा रशियाचा भाग आहे, त्यामुळे झेलेन्स्की यांच्या भेटीवर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही’, असे रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात रशियन लष्कराच्या खेर्सनमधील माघारीनंतरही पेस्कोव्ह यांनी प्रतिक्रिया टाळताना सदर निर्णय रशियाच्या संरक्षण विभागाचा असल्याने त्यांना प्रश्न विचारा, असे म्हटले होते.

दरम्यान, रशिया व अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांची तुर्कीत भेट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. रशियाची गुप्तचर यंत्रणा ‘एसव्हीआर’चे प्रमुख सर्जेई नॅरिश्किन यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी तुर्कीला भेट दिल्याचे ‘कॉमरसॅन्ट’ या रशियन दैनिकाने म्हटले आहे. अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या प्रवक्त्यांनी ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तुर्कीत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ‘अमेरिकेने आण्विक धोके व सामरिक स्थैर्याच्या मुद्यावर रशियाशी संवाद साधण्याचे मार्ग अजूनही खुले ठेवलेले आहेत व ही गोष्ट कधीही नाकारलेली नाही. त्याचाच भाग म्हणून सीआयएचे प्रमुख रशियन गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांची अंकारात भेट घेणार आहेत’, असे नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या प्रवक्त्यांनी सांगितले. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनीही रशियाच्या सुरक्षा सल्लागारांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली होती.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info