मॉस्को/ब्रुसेल्स – ‘युक्रेनमधील रक्तपात थांबविणे, शांतीचर्चेची इच्छा आणि युक्रेनला अधिकाधिक शस्त्रपुरवठा करणे या परस्परविरोधी गोष्टी आहेत, याची जाणीव पाश्चिमात्य देशांमधील नेत्यांनी ठेवावी. अधिकाधिक बळी गेल्यावर शांततेसाठी सुरू असलेल्या वाटाघाटींची शक्यता वाढेल, अशा भ्रमात राहू नका’, अशा शब्दात रशियाचे वरिष्ठ संसद सदस्य कॉन्स्टन्टिन कोसाचेव्ह यांनी पाश्चिमात्य देशांना फटकारले. सोमवारी नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी, रशिया-युक्रेन वाटाघाटींमध्ये युक्रेनच्या बाजूने तोडगा हवा असेल तर त्या देशाला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करणे आवश्यक असल्याचा दावा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना रशियन संसद सदस्यांनी पाश्चिमात्यांवर टीकास्त्र सोडले.
गेल्या काही दिवसात रशिया-युक्रेन संघर्ष अधिकाधिक प्रखर होत असल्याचे दिसत असून हल्ल्यांची तीव्रताही वाढली आहे. रशियाकडून डोन्बास क्षेत्रात जोरदार हल्ले सुरू असून युक्रेनच्या विविध शहरांवर मोठे क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ले सुरू आहेत. तर युक्रेनने खेर्सनमधील प्रतिहल्ल्यांची व्याप्ती वाढविली असून रशियातील काही भागांनाही लक्ष्य करण्यात येत आहेत. त्याचवेळी रशिया अणुहल्ला चढवू शकतो, असे दावेही पाश्चिमात्यांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यासारख्या देशांकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठाही सुरू आहे.
पाश्चिमात्य देशांकडून शस्त्रपुरवठा होत असतानाही युक्रेन सातत्याने नव्या व प्रगत यंत्रणांची मागणी पुढे करीत आहे. युक्रेनच्या सर्व मागण्या पूर्ण करणे शक्य नसले तरी त्याला शस्त्रांची टंचाई भासणार नाही, याची काळजी घ्यायला हवी असे आवाहन नाटोकडून करण्यात आले आहे. रशिया-युक्रेन युद्धाची अखेर वाटाघाटींमधूनच होईल, असा दावा नाटोचे प्रमुख स्टॉल्टनबर्ग यांनी केला आहे. ‘मात्र वाटाघाटींमध्ये काय होईल, याचा निर्णय रणांगणावर असलेल्या स्थितीवर अवलंबून असेल. त्यामुळे युक्रेनला संरक्षणसहाय्य करीत राहणे आवश्यक आहे’, असे स्टॉल्टनबर्ग यांनी सांगितले. नाटो देशांनी युक्रेनला दीर्घकाळपर्यंत शस्त्रपुरवठा करण्याची तयारी ठेवावी, असेही स्टॉल्टनबर्ग पुढे म्हणाले.
दरम्यान, रशियाने बेलारुसमधील अणुप्रकल्पावर ‘फॉल्स फ्लॅग’ प्रकारातील हल्ल्यांची योजना आखली आहे, असा दावा युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. सदर हल्ला युक्रेन व नाटोने घडविल्याचा देखावा निर्माण करून बेलारुसला रशिया-युक्रेन संघर्षात सहभागी करून घेतले जाईल, असे युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांनी सांगितले. बेलारुसमधील ॲस्ट्राव्हेट्स हा अणुप्रकल्प लिथुआनियाच्या सीमेजवळ असल्याने या देशावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे युक्रेनी यंत्रणांनी बजावले आहे.
गेल्या २४ तासात रशियाने डोन्बास क्षेत्रातील बाखमत, ॲव्हडिव्हका व लिमन या शहरांवर तोफा व रॉकेट्सचा जोरदार मारा केला. त्याव्यतिरिक्त दक्षिण युक्रेनमधील खेर्सन, मायकोलेव्ह तसेच झॅपोरिझिआमध्येही मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ले करण्यात आल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |