मॉस्को/किव्ह – युक्रेनी लष्कराकडून डिनिप्रो नदीच्या दुसऱ्या भागात असलेल्या रशियन फौजांवर जोरदार हल्ले सुरू आहेत. रशियन सैन्याला मागे ढकलण्यासाठी सुरू असलेल्या या हल्ल्यांना फारसे यश मिळाले नसून उलट रशियाने खेर्सन शहरावरील मारा अधिक तीव्र केल्याचे समोर येत आहे. गुरुवार तसेच शुक्रवार असे सलग दोन दिवस रशियन संरक्षणदलांनी खेर्सनवर क्षेपणास्त्रांचे हल्ले केले. खेर्सनबरोबरच झॅपोरिझिआ व मायकोलेव्ह प्रांतालाही लक्ष्य करण्यात आले. त्याचवेळी राजधानी किव्हवरील क्षेपणास्त्रहल्ल्यांमुळे या शहरातील ५० टक्के वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली.
काही दिवसांपूर्वी खेर्सन शहरातून रशियाने घेतलेली माघार चर्चेचा विषय ठरली होती. खेर्सन प्रांताला रशियाला जोडल्याचे घोषित केल्यानंतर घेतलेली ही माघार म्हणजे रशियाच्या युक्रेनमधील पराजयाचे संकेत असल्याचे दावे पाश्चिमात्य विश्लेषक व माध्यमांनी सुरू केले होते. तर युक्रेनी अधिकाऱ्यांनी आता पुढील लक्ष्य क्रिमिआ असल्याच्या बढाया मारण्यास सुरुवात केली होती. मात्र प्रत्यक्षात खेर्सनमधील डिनिप्रो नदीच्या एका काठावरील भाग वगळता इतर भागांमध्ये पुढे जाण्यात युक्रेनी लष्कर अपयशी ठरले आहे. उलट डिनिप्रो नदीच्या दुसऱ्या भागात असणाऱ्या रशियाने भक्कम बचावफळी उभारून ठाण मांडल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी या भागातून खेर्सन शहरात मोठ्या प्रमाणावर तोफा व रॉकेट्सचा मारा करण्यात आला होता. त्यानंतर आता रशियाने खेर्सनमध्ये क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू केले आहेत. गेल्या दोन दिवसात खेर्सनमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याची माहिती युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यांमध्ये नागरी वस्त्यांसह पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचेही सांगण्यात येते.
खेर्सनपाठोपाठ झॅपोरिझिआ व मायकोलेव्हमध्येही सलग दोन दिवस क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यांमध्ये अनेकांचा बळी गेल्याचे युक्रेनच्या यंत्रणांनी सांगितले. झॅपोरिझिआला जोडून असलेल्या डिनिप्रोपेट्रोव्हस्क प्रांतात रशियाने मोठ्या प्रमाणात तोफांचा मारा केल्याचेही समोर येत आहे. या हल्ल्यांमुळे रशियन फौजांना मागे रेटण्याच्या वल्गना करणाऱ्या युक्रेनी लष्करात अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसते.
रशियाने क्षेपणास्त्र हल्ल्यांचे सत्र सुरू केल्यानंतर रशियाकडील क्षेपणास्त्रांचे साठे संपत चालल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण हे दावे व बातम्या खोट्या ठरवून गेल्या काही दिवसात रशियाने आपली संरक्षणक्षमता नव्याने दाखवून दिली आहे.
दरम्यान, राजधानी किव्हमधील क्षेपणास्त्रहल्ल्यांनंतर या शहरातील ५० टक्के वीजपुरवठा बंद पडल्याची माहिती युक्रेनच्या सरकारने दिली. वीजपुरवठा बंद झाल्यामुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला असून युक्रेनी जनतेच्या हालअपेष्टांमध्ये यामुळे अधिकच भर पडली आहे. किव्हबरोबरच युक्रेनमधील बहुतांश आघाडीच्या शहरांमध्ये थोड्याफार फरकाने अशीच स्थिती असल्याची कबुली युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |