रशियाकडून युक्रेनमधील खार्किव्ह व सुमी प्रांतांवर जोरदार हल्ले

- मारिपोलमध्ये रशियाने नवा तळ उभारला

मॉस्को/खार्किव्ह – दोन महिन्यांपूर्वी युक्रेनच्या खार्किव्ह प्रांतातून घेतलेल्या माघारीनंतर रशियन लष्कराने पुन्हा खार्किव्ह व सुमी प्रांतांवर जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली. गेल्या ४८ तासांमध्ये रशियाने या दोन प्रांतांमध्ये १००हून अधिक हल्ले केल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली. या हल्ल्यांसाठी तोफा, रणगाडे, रॉकेट्स, मॉर्टर्स याबरोबरच क्षेपणास्त्रांचाही वापर झाल्याचे सांगण्यात येते. २४ तासांपूर्वीच रशियाने डोन्बास क्षेत्रातील बाखमतसह इतर आघाड्यांवर घणाघाती हल्ले केल्याचे समोर आले होते. रशियन हल्ल्यांची तीव्रता वाढत असतानाच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व्हिक्टोरिआ न्यूलँड यांनी युक्रेनला भेट दिली आहे.

खार्किव्ह व सुमी

सप्टेंबर महिन्यात रशियन फौजांना खार्किव्ह शहर व जवळच्या परिसरातून माघार घेणे भाग पडले होते. रशियन लष्कराची ही माघारी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या युक्रेन मोहिमेसाठी नामुष्की असल्याचे दावे युक्रेन व पाश्चिमात्य माध्यमांकडून करण्यात आले होते. या माघारीनंतर रशियाची मोहीम दीर्घकाळ टिकणार नाही, असेही म्हटले जात होते. मात्र पाश्चिमात्यांचे हे दावे फोल ठरले असून उलट रशियन फौजांनी पुन्हा खार्किव्ह व जवळच्या क्षेत्राला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ऑक्टोबर महिन्यात सुरू केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांदरम्यानही रशियाने खार्किव्ह तसेच सुमी शहरावर क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. मात्र आता तोफा, रणगाडे व मॉर्टर्सच्या सहाय्याने रशियन लष्कर सातत्याने मारा करीत असल्याचे समोर येत आहे.

खार्किव्ह व सुमी

शनिवारी रशियन लष्कराने खार्किव्ह प्रांतातील कुपिआन्स्क, इझियम तसेच खार्किव्ह जिल्ह्यांमधील अनेक भागांवर हल्ले केल्याचे युक्रेनी यंत्रणांकडून सांगण्यात आले. या हल्ल्यांमध्ये ‘एस-३००’ क्षेपणास्त्रांचाही वापर करण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला. त्यापूर्वी शुक्रवारी सुमी प्रांतातील चार भागांमध्ये ७०हून अधिक हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांसाठी मॉर्टर्स व आर्टिलरी सिस्टिमचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनी लष्कराच्या डोन्बासमधील मोहिमेला धक्का बसल्याचे सांगण्यात येते.

खार्किव्ह व सुमी

रशिया हल्ल्यांची व्याप्ती पुन्हा वाढवित असतानाच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व्हिक्टोरिया न्यूलँड युक्रेन दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. त्यांनी राजधानी किव्हमध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासह वरिष्ठ नेते व अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्याचवेळी रशियान केलेल्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली. ‘पुतिन यांनी युक्रेनच्या युद्धाला अधिक रानटी व क्रूर बनविले आहे. रणांगणावर यश मिळत नसल्याने युक्रेनच्या प्रत्येक घरातील वीज व पाणीपुरवठा तोडून यश मिळत असल्याचे दाखविण्यात येत आहे’, अशा शब्दात न्यूलँड यांनी पुतिन यांच्यावर टीकास्त्र सोडले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष शांतीचर्चेच्या मुद्यावर प्रामाणिक नसल्याचा आरोपही अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला.

दरम्यान, रशियाने डोनेत्स्क प्रांतातील मारिपोल शहरात नवा लष्करी तळ उभारल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. मे महिन्यात रशियाने या शहरावर ताबा मिळविला होता. त्यानंतर रशियाने या शहरावरील आपली पकड अधिक भक्कम केली असून लष्करी तळाची उभारणी त्याचाच भाग ठरतो.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info