मॉस्को/किव्ह – अमेरिकेने युक्रेनमध्ये ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रे पाठविण्याचा निर्णय घेतल्यास ही बाब जागतिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल, असा इशारा रशियाने दिला आहे. युक्रेनमधील पॅट्रियॉट यंत्रणा रशियन संरक्षणदलांचे लक्ष्य असतील, असेही रशियाकडून बजावण्यात आले. हा इशारा देत असतानाच रशियाने राजधानी मॉस्कोनजिक असणाऱ्या संरक्षणतळावर दोन ‘यार्स’ अण्वस्त्रे तैनात करून त्याचे फोटोग्राफ्स तसेच व्हिडिओ प्रदर्शित केले आहेत.
गेल्या काही दिवसात रशिया व युक्रेनमधील संघर्ष अधिकाधिक प्रखर होत चालल्याचे दिसत आहे. रशियाने क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, लढाऊ विमानांसह तोफा, रॉकेट्स यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर हल्ले केले आहेत. युक्रेनकडूनही रशियन भूभागांमधील शहरांमध्ये घातपात घडविण्यात येत असून इंधनसाठे तसेच लष्करी तळ लक्ष्य करण्यात येत आहेत. रशियन हल्ल्यांची तीव्रता मोठी असून राजधानी किव्हसह अनेक शहरांमधील वीजपुरवठा यंत्रणा व इतर पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्या आहेत. रशियाचे हे वाढते हल्ले रोखण्यासाठी युक्रेनच्या सत्ताधारी राजवटीने अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांकडे पुन्हा एकदा प्रगत शस्त्रांची मागणी पुढे केली आहे.
युक्रेनच्या नव्या मागणीनंतर अमेरिकेने या देशाला पॅट्रियॉट क्षेपणास्त्रे पुरविण्याचे संकेत दिले आहेत. पॅट्रियॉटचा पल्ला दीडशे किलोमीटर्सहून अधिक असून क्षेपणास्त्रे व लढाऊ विमानांना भेदण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेने सध्या युरोप तसेच आखाती देशांसह जपानमधील तळांवर ही क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे. गेल्या शतकात झालेल्या आखाती युद्धात अमेरिकेने या क्षेपणास्त्रांचा प्रभावी वापर केल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर युक्रेनला ही यंत्रणा देण्याचे संकेत लक्ष वेधून घेणारे ठरतात. अमेरिकेकडून सुरू झालेल्या हालचालींवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह, माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह तसेच रशियन दूतावासाने कडक इशारा दिला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव्ह यांनी युक्रेनमध्ये दाखल होणारी पॅट्रियॉट यंत्रणा रशियन संरक्षणदलांचे वैध लक्ष्य असेल, असे बजावले आहे. रशियाचे प्रवक्ते पेस्कोव्ह यांनीही, रशियन फौजा पॅट्रियॉटवर हल्ले करतील, असे म्हटले आहे. तर अमेरिकेतील रशियन दूतावासाने पॅट्रियॉट युक्रेनमध्ये तैनात होणे जागतिक सुरक्षेसाठी धोकादायक बाब ठरते, असा इशारा दिला. अमेरिकी क्षेपणास्त्रांच्या तैनातीचे भयानक व अनपेक्षित परिणाम युक्रेनसह पाश्चिमात्य आघाडीला भोगावे लागतील, याची जाणीवही दूतावासाने करून दिली.
दरम्यान, अमेरिकेकडून ‘पॅट्रियॉट’साठी हालचाली सुरू असतानाच रशियाने राजधानी मॉस्कोनजिक असणाऱ्या कोझेलस्की तळावर दोन ‘यार्स’ अण्वस्त्रे तैनात केली आहेत. रशियन संरक्षणदलांकडून ‘डे ऑफ स्ट्रॅटेजिक मिसाईल फोर्सेस’निमित्त सराव आयोजित करण्यात येत असून त्यासाठी ही अण्वस्त्रे तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या तैनातीचे फोटोग्राफ्स तसेच व्हिडिओ रशियाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राजधानी मॉस्कोनजिकच्या तळावरील अण्वस्त्रांची नवी तैनाती युक्रेनसह पाश्चिमात्य आघाडीला दिलेला संदेश असल्याचा दावा रशियन कमांडर ॲलेक्सी सोकोलोव्ह यांनी दिला. या तैनातीच्या पार्श्वभूमीवर, रशियाचे निवृत्त लष्करी अधिकारी आंद्रे गुरुलेव्ह यांनी, रशिया लंडनवर अण्वस्त्रहल्ला चढवून अमेरिकेला पहिला व शेवटचा इशारा देईल, अशी धमकी दिली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |