मॉस्को/किव्ह – आपल्या ताब्यात असलेल्या पूर्व युक्रेनच्या भागातील हॉस्पिटलवर युक्रेनी लष्कराने हल्ला चढविला व 14 जणांचा बळी घेतला, असा आरोप रशियाने केला आहे. शनिवारपासून रशियाबरोबरील युद्धात युक्रेनी लष्कराने अमेरिकेकडून मिळालेल्या ‘एचआयएमएआरएस-हिमर्स’ रॉकेट यंत्रणेचा मारा सुरू केला आहे. यात रशियाचे फार मोठे नुकसान झाल्याचे दावे युक्रेनी लष्कराने केले. मात्र रशियाच्या आरोपांना अद्याप युक्रेनी लष्कराने उत्तर दिलेले नाही. युक्रेनचे युद्ध वेगळ्या टप्प्यावर आलेले असताना, या युद्धापेक्षाही भयंकर मोठे युद्ध रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतिन येत्या 24 फेब्रुवारी रोजी सुरू करतील, असा इशारा एका रशियन विश्लेषकाने दिला आहे. या युद्धाद्वारे नाटोला लक्ष्य करून पूर्व युरोपिय देश आपल्या टाचेखाली आणण्याची राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची योजना असल्याचे विश्लेषक ग्रिगोरी युदीन यांनी केला आहे.
युक्रेनचे युद्ध सुरू होऊन 11 महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या युद्धात रशियाने युक्रेनचा भूभाग बळकावला असून युक्रेन या भागाचा ताबा घेण्यासाठी अजूनही धडपडत आहे. अमेरिका व पाश्चिमात्य देशांकडून आत्तापर्यंत मिळालेल्या व पुढच्या काळात मिळणाऱ्या प्रगत शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याचा वापर करून युक्रेनी लष्कर या युद्धाचे पारडे फिरविल, असा विश्वास युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्यक्त करीत आहेत. शनिवारपासून रशियन लष्कराच्या विरोधात अमेरिकेकडून मिळालेल्या हिमर्स रॉकेट यंत्रणेचा वापर करून युक्रेनी लष्कराने यामुळे रशियाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला. पुढच्या काळात देखील रशियाला या युद्धात अशीच हानी सहन करावी लागेल, असे दावे युक्रेनचे लष्कर करीत आहे.
पण युक्रेनचे युद्ध छेडणाऱ्या रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे ध्येय अगदी वेगळे असल्याचा दावा रशियन ग्रिगोरी युदीन यांनी केला. ‘मॉस्को स्कूल ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक सायन्स’चे प्रोफेसर असलेल्या ग्रिगोरी युदीन यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांना युक्रेनचे अस्तित्त्वच मान्य नसल्याची बाब लक्षात आणून दिली. ज्याला अस्तित्त्वच नाही, त्याच्याशी लढण्यात काय अर्थ, असा सवाल करून ग्रिगोरी यांनी युक्रेनमध्ये छेडलेल्या युद्धामागे रशियाचे वेगळेच डावपेच असल्याचे स्पष्ट केले. युक्रेनच्या युद्धात रशिया युक्रेनशी नाही, तर नाटोशी लढत आहे आणि नाटोला लक्ष्य करून पूर्व युरोप आपल्या टाचेखाली आणण्याचे ध्येय राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपल्यासमोर ठेवल्याचा दावा ग्रिगोरी यांनी केला.
इतकेच नाही तर सोव्हिएत रशियाच्या काळाप्रमाणे रशियाच्या वर्चस्वाचा विस्तार पूर्व युरोपिय देशांमध्ये करून इथे पुन्हा एकदा ‘आयर्न कर्टन’ उभारण्याची तयारी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केल्याचे ग्रिगोरी यांनी म्हटले आहे. या आयर्न कर्टनचा अर्थ अमेरिका व नाटोला या क्षेत्रात आपला प्रभाव वाढविण्याची जराही संधी न मिळणे, असा होतो. पोलंड आणि लिथुआनियात शिरकाव केलेल्या नाटोला इथून हुसकावून लावण्याचे रशियाचे इरादे आहेत. रशियन लष्कर सध्या युक्रेनच्याही पलीकडे जाऊन माल्दोवातील लष्करी कारवाईवर विचार करू लागले आहे, अशी धक्कादायक माहिती ग्रिगोरी युदीन यांनी दिली. रशियन लष्कराने सुरू केलेली भक्कम मोर्चेबांधणी ही बाब अधोरेखित करीत असल्याचा दावा ग्रिगोरी यांनी केला.
अशा परिस्थितीत पाश्चिमात्य देश पोलंड आणि लिथुआनिआ या देशांना वाचविण्यासाठी रशियाशी लढणार नाहीत, असे सांगून ग्रिगोरी यांनी पाश्चिमात्य देशांवर तोफ डागली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |