राजधानी किव्हसह ओडेसा व मध्य युक्रेनमध्ये रशियाचे प्रखर क्षेपणास्त्र हल्ले

- ३० क्रूझ क्षेपणास्त्रे डागली

मॉस्को/किव्ह – युक्रेनची प्रतिहल्ल्यांची मोहीम सातत्याने लांबणीवर पडत असतानाच रशियाने मात्र आपली मोहीम अधिक आक्रमक व व्यापक केल्याचे दिसत आहे. बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटे रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी किव्हसह ओडेसा तसेच मध्य युक्रेनमधील तीन प्रांतांना लक्ष्य केले. या भागांवर क्रूझ क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सचा मारा करण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. सदर हल्ल्यात रशियन सैन्याने आपली उद्दिष्टे साध्य केल्याचा दावाही संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी केला.

ओडेसा

गेल्या काही दिवसात रशियन संरक्षणदलांना युक्रेन आघाडीवर धक्के बसत असल्याची माहिती माध्यमांमधून समोर येत होती. हे धक्के बसत असतानाही रशियाने युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता वाढविणे लक्ष वेधून घेणारे ठरते. गेले काही महिने रशियाने क्षेपणास्त्रहल्ल्यांना विराम दिल्याचे दिसून आले होते. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून रशियाने क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ल्यांची तीव्रता पुन्हा एकदा वाढविली आहे. बुधवारी रात्री तसेच गुरुवारी पहाटे राजधानी किव्हवर केलेला हल्ला या महिन्यातील नववा क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ला ठरला आहे.

ओडेसा

बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास किव्हमध्ये हल्ल्याचे सायरन वाजण्यास सुरुवात झाली. गुरुवारी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत राजधानी किव्हसह युक्रेनच्या इतर भागांमध्ये क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सचा मारा सुरू राहिला, असे युक्रेनी यंत्रणांनी स्पष्ट केले. क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी रशियाने बॉम्बर विमानांसह युद्धनौका तसेच लष्करात तैनात असणाऱ्या मिसाईल सिस्टिम्सचा वापर केल्याचेही सांगण्यात येते. ‘केएच १०१’, ‘केएच ५५५’, कॅलिबर तसेच इस्कंदर या क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ले करण्यात आल्याची माहिती युक्रेनने दिली.

ओडेसा

बुधवारी रात्री केलेल्या हल्ल्यांमध्ये रशियन सैन्याने आपली सर्व नियोजित लक्ष्ये उद्ध्वस्त करण्यात यश मिळविले, असे रशियाच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. युक्रेनी संरक्षणदलाचा शस्त्रसाठा तसेच इतर सामुग्री मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याचा दावाही रशियाने केला. युक्रेनने हा दावा फेटाळला असून नागरी वस्तीतील इमारती व पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले.

यापूर्वी रशियन सैन्याने सोमवारी रात्री राजधानी किव्हला लक्ष्य केले होते. किव्हवर तब्बल १८ क्षेपणास्त्रे तसेच १० ड्रोन्सचा मारा केला होता. यात सहा ‘किन्झाल’ हायपरसोनिक क्षेपणास्त्रे, नऊ क्रूझ मिसाईल्स व तीन ‘एस-४००’ क्षेपणास्त्रांचा समावेश होता. यातील किन्झाल हायपसोनिक क्षेपणास्त्रांनी अमेरिकेच्या ‘पॅट्रिऑट’ यंत्रणेला लक्ष्य केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली होती. अमेरिकेने याची कबुलीही दिली आहे.

रशियाचे हे वाढते हल्ले युक्रेनमधील हवाईसुरक्षायंत्रणांची क्षमता संपविण्यासाठी तसेच युक्रेनचे नियोजित प्रतिहल्ले उधळण्यासाठी असल्याचे सांगण्यात येते. हे हल्ले सुरू असतानाच युक्रेनबरोबरील ‘ग्रेन डील’ला ६० दिवसांची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे रशियाने जाहीर केले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info