पाकिस्तानची ‘एफ-१६’ भारतावर हल्ल्याच्या तयारीत – सीमेवर हल्लेखोर ड्रोन्सही तैनात केले

पाकिस्तानची ‘एफ-१६’ भारतावर हल्ल्याच्या तयारीत – सीमेवर हल्लेखोर ड्रोन्सही तैनात केले

नवी दिल्ली/इस्लामाबाद – भारताच्या सीमेनजिक असलेल्या आपल्या तळांवर ‘एफ-१६’ लढाऊ विमाने तैनात करून कुठल्याही क्षणी भारतावर हल्ल्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाकिस्तानात उच्चस्तरिय सुरक्षाविषयक बैठकीत भारताने पुन्हा हल्ला चढवला, तर अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्याचा निर्धार पाकिस्तानच्या लष्करी व राजकीय नेतृत्त्वाने केल्याची माहिती पाकिस्तानी वर्तमानपत्रांनी दिली. पाकिस्तानच्या हालचालींवर करडी नजर असलेल्या भारताच्या वायुसेनेने सीमेवर अधिक सक्षम हवाई सुरक्षा यंत्रणा व क्षेपणास्त्रांची मागणी केली आहे.

बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व तिन्ही संरक्षणदलांचे प्रमुख तसेच इतर वरिष्ठ अधिकार्‍यांची तातडीची बैठक पार पडली. याआधी पाकिस्तानात इतक्या तातडीने सुरक्षाविषयक बैठक आयोजित करण्यात आली नव्हती, असा दावा या देशाच्या एका वृत्तपत्राने केला. या बैठकीत पाकिस्तानच्या पंतप्रधान व लष्करी अधिकार्‍यांनी भारताच्या संभाव्य हल्ल्याला जबरदस्त प्रत्युत्तर देण्याच्या निर्णय घेतला. तसेच भारताचा उल्लेख या बैठकीत ‘शत्रू’ असाच करण्यात आला होता, हे ही या दैनिकाने आपल्या बातमीत म्हटले आहे. या बैठकीच्याही आधी पाकिस्तानने भारताच्या सीमेनजिक असलेल्या आपल्या पंजाब प्रांतातील ‘मुशफ’ तळावर सुमारे आठ ‘एफ-१६’ लढाऊ विमाने तैनात केल्याचे उघड झाले आहे.

‘एफ-१६’ ही पाकिस्तानच्या हवाई दलातील सर्वात प्रगत विमाने मानली जातात. त्यांची या तळावरील तैनाती भारताला आव्हान देण्यासाठीच असून या विमानांना कुठल्याही क्षणी भारतावर हल्ला चढविण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबरोबरच पाकिस्तानने हल्ला चढवू शकणारे ड्रोन्स देखील भारताच्या गुजरात येथील सीमेजवळील आपल्या प्रांतात तैनात केल्याचे वृत्त आहे. जम्मू-काश्मीरच्या उरी, राजौरी, नौशेरा व पुंछ या जिल्ह्यांजवळील नियंत्रण रेषेनजिक पाकिस्तान हे हल्लेखोर ड्रोन्स तैनात करणार असल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानच्या या चिथावणीखोर कारवाया लक्षात घेऊन भारताच्या वायुसेनेनेही आपली सिद्धता वाढविली आहे. सीमाभागात अधिक सक्षम हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याची मागणी वायुसेनेने केली आहे. इतकेच नाही तर वायुसेनेने आपल्या लढाऊ विमानांसाठी नव्या क्षेपणास्त्रांचीही मागणी केली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर कुठल्याही क्षणी संघर्षाचा भडका उडू शकतो, अशी स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info