कैरो – ‘अण्वस्त्रसज्जतेच्या दिशेने पावले टाकणारा इराण, या देशाची क्षेपणास्त्रे आणि आखाती देशांमध्ये घातपात घडविणारे इराणचे दहशतवादी या क्षेत्राच्या स्थैर्यासाठी धोकादायक ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने इराणचा हा धोका टाळण्यासाठी आखाती देशांना सहाय्य करावे’, असे आवाहन सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान यांनी केले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाने इराणसोबत कुठलाही करार करण्याआधी इराणपासून असुरक्षित असलेल्या देशांना याच्या चर्चेत सहभागी करावे, अशी मागणी सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने येमेनमध्ये युद्धविराम लावण्यासाठी सौदी अरेबियाला देण्यात येणारे लष्करी सहाय्य रोखले. तसेच इराणसमर्थक हौथी बंडखोरांना दहशतवादी गटांच्या यादीतून वगळले होते. पण बायडेन प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयानंतर चोवीस तास उलटण्याआधीच हौथी बंडखोरांनी सौदीच्या दक्षिण सीमाभागात सलग दोन दिवस ड्रोन हल्ले चढविले. सौदी आणि अरब मित्रदेशांच्या आघाडीने हौथींचे हे ड्रोन हल्ले यशस्वीरित्या भेदले. त्यानंतर हौथींनी मरिब आणि जौफ भागात चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नागरिकांचा बळी गेला.
या पार्श्वभूमीवर, इजिप्तची राजधानी कैरो येथे अरब लीगची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान अल सौद यांनी इराण आणि इराणसमर्थक दहशतवादी संघटनांवर सणकून टीका केली. ‘इराणच्या आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा विकास आखाती क्षेत्राला धोक्यात टाकणारा आहे’, याची जाणीव इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी उत्सुक असलेल्या अमेरिकेला प्रिन्स फैझल यांनी करुन दिली.
‘आज जर आखाती क्षेत्राला कुणापासून सर्वाधिक धोका असेल तर ती इराणची राजवट आहे. इराणची राजवट आपल्या कारवायांनी आंतरराष्ट्रीय नियम, कायद्यांचे वारंवार उल्लंघन करून आखाती देशांना धमकावत आहे, त्यांची सुरक्षा आणि स्थैर्य धोक्यात टाकत आहे. त्याचबरोबर दहशतवादी संघटनांच्या सहाय्याने आखाती देशांमध्ये लष्करी हस्तक्षेप करून येथे अराजकता आणि विध्वंस माजवित आहेत’, असा हल्ला सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चढविला.
तेव्हा इराणच्या अणुकार्यक्रमापासून आणि इराणसमर्थक दहशतवाद्यांपासून सर्वाधिक असुरक्षित असलेल्या देशांना इराणबरोबरच्या कुठल्याही चर्चेमध्ये सामील करून घ्यावे. या क्षेत्रातील देशांच्या सहभागाशिवाय इराणबरोबर पार पडलेली कुठलीही चर्चा यशस्वी होणार नाही, असे प्रिन्स फैझल यांनी बजावले आहे.
दोन दिवसांपूर्वीच इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी अणुकरार करण्यासाठी अमेरिकेकडे दोन आठवड्यांची अर्थात २० फेब्रुवारीपर्यंतची मुदत असल्याचे धमकावले होते. तसेच अमेरिकेने इराणवरील सर्व निर्बंध काढल्याशिवाय कुठल्याही प्रकारची चर्चा शक्य नसल्याचे इराणने ठणकावले आहे. अणुकराराबाबतच्या चर्चेत इतर कुठल्याही नव्या देशाला सहभागी करून घेऊ नये, असेही इराणने स्पष्ट केले आहे. त्यावर सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांची ही प्रतिक्रिया आली आहे.
दरम्यान, अमेरिकेत बायडेन प्रशासनाने सूत्रे हातात घेतल्यानंतर हौथी बंडखोरांचे हल्ले वाढले असून अणुकार्यक्रम राबविणार्या इराणचा आत्मविश्वासही दुणावल्याचा दावा केला जातो.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |