तैवानच्या लष्कराचा चीनसमोर निभाव लागणार नाही – चीनच्या सरकारी मुखपत्राचा इशारा

तैवानच्या लष्कराचा चीनसमोर निभाव लागणार नाही – चीनच्या सरकारी मुखपत्राचा इशारा

बीजिंग – ‘तैवान अशा युद्धासाठी चीनला आव्हान देत आहेत, जे युद्ध ते कधीच जिंकू शकत नाहीत. कारण चीनचे लष्कर तैवानमध्ये शिरल्यानंतर त्यांच्या सामर्थ्यासमोर तैवानचे जवान फार काळ टिकू शकणार नाहीत’, असा इशारा चीनच्या सरकारी मुखपत्राने दिला. दोन दिवसांपूर्वीच तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अखेरच्या दिवसापर्यंत चीनच्या विरोधात युद्ध खेळले जाईल, अशी घोषणा केली होती. त्यावर चीनच्या सरकारी मुखपत्राने ही धमकी दिल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून चीनने तैवानबाबत आक्रमक भूमिका स्वीकारून अमेरिका व इतर देशांना धमकावण्यास सुरुवात केली आहे. चार दिवसांपूर्वीच चीनच्या ‘लिओनिंग’ या विमानवाहू युद्धनौकेने आपल्या विनाशिकांच्या ताफ्यासह तैवानच्या आखातातून गस्त घातली होती. यावेळी चीनच्या लढाऊ विमानांनीही तैवानच्या हवाईहद्दीजवळून उड्डाण केले होते. तैवानच्या सागरी व हवाईहद्दीला आव्हान दिल्यानंतर चीनने यापुढेही अशाप्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याची घोषणा केली होती.

चीनच्या युद्धनौकेच्या या गस्तीनंतर तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी चीनला खडसावले होते. तैवानचा ताबा घेण्यासाठी चीन लवकरच हल्ला चढवू शकतो, याची आपल्याला जाणीव आहे. तैवानच्या विरोधातील चीनच्या हल्ल्याची शक्यता धोकादायक स्तरावर पोहोचली आहे, एवढे अमेरिकी अधिकार्‍यांच्या बोलण्यातून समोर येत आहे. तसेच असेल तर चीनच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी तैवान सज्ज आहे. तैवानच्या सुरक्षेसाठी अखेरच्या दिवसापर्यंत लढा द्यावा लागला तरी आम्ही तो लढा देऊ’, अशी घोषणा परराष्ट्रमंत्री वू यांनी केली होती.

त्यावर चीनकडून प्रतिक्रिया उमटली आहे. ‘चीनच्या नौदलाचा तैवानच्या हद्दीजवळ पूर्ण झालेला सराव फक्त इशारा नाही तर चीनच्या सामर्थ्याचे प्रदर्शन आहे. तसेच येत्या काळात तैवानला चीनमध्ये सामावून घ्यायचे झाले तर त्याची व्यावहारिकदृष्ट्या केलेली मांडणी होती. त्यामुळे चीनचे लष्कर जेव्हा कधी तैवानमध्ये पाऊल ठेवेल, तेव्हा त्यांच्यासमोर तैवानच्या लष्कराचा निभाव लागणार नाही’, असे चीनच्या मुखपत्राने धमकावले. त्याचबरोबर चीनच्या हल्ल्याविरोधात तैवानने आखलेल्या सरावावरही या मुखपत्राने टीका केली.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info