वॉशिंग्टन/लंडन/बीजिंग – मार्च महिन्यात उघड झालेल्या ‘मायक्रोसॉफ्ट एक्सेंज सर्व्हर’वरील हल्ल्यामागे चीनचाच हात असल्याचा ठपका अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाने ठेवला आहे. या सायबरहल्ल्याचा फटका अमेरिकेसह जगभरातील 30 हजार उपक्रमांना बसला होता. सोमवारी या सायबरहल्ल्यावर अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांसह नाटो तसेच युरोपिय महासंघाने एकत्रित निवेदन जारी करून चीनला जबाबदार धरले. हा सायबरहल्ला म्हणजे गुन्हेगारी कृत्य असल्याचा ठपका या निवेदनात ठेवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने अशारितीने चीनच्या सायबरहल्ल्यांविरोधात एकजूट दाखवून आवज उठविण्याची ही पहिलीच वेळ ठरते.
सायबरहल्ल्यांच्या आघाडीवर चीन हा रशियापेक्षा वाईट व घातक देश आहे. सायबरहल्ले करणार्या हॅकर्सना चीनची राजवट आश्रय देत असून हल्ले करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरवित आहे, असे जाहीर करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनला धक्का दिला.
तसेच चीनने केलेल्या सायबरहल्ल्यांचा तपास अजूनही सुरू असल्याची माहितीही बायडेन यांनी दिली. बायडेन यांच्या पत्रकार परिषदेनंतर व्हाईट हाऊसने यावर स्वतंत्र निवेदनही प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात अमेरिकेसह प्रमुख मित्र व सहकारी देशांनी चीनला सायबरहल्ल्यांसाठी जबाबदार धरल्याची माहिती देण्यात आली. चीनची ‘मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी’ ही यंत्रणा या हल्ल्यांमागे असल्याचेही यात सांगण्यात आले आहे. बायडेन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्याने या मुद्यावर चीनच्या राजवटीशी चर्चा झाल्याचेही नमूद केले.
ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनीही चीनवर आरोप करताना मायक्रोसॉफ्टवरील हल्ले सायबर घातपाताचा प्रकार ठरतो, असा घणाघाती आरोप केला. चीनचे हे कृत्य गुन्हेगारी स्वरुपाचे असून यासाठी त्यांना जबाबदार धरण्याची वेळ आली असल्याचेही ब्रिटीश परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले.
गेल्या वर्षभरात अमेरिकेतील कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात सायबरहल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील ‘सोलरविंडस्’ या कंपनीवर झालेल्या हल्ल्यामागे रशियन हॅकर्स असल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला होता. याप्रकरणी रशियाविरोधात निर्बंध लादण्याचा तसेच प्रत्युत्तरादाखल हल्ले करण्याचा इशाराही अमेरिकेने दिला होता. मात्र चीनने केलेल्या सायबरहल्ल्यांबाबत कारवाईची भूमिका बायडेन प्रशासनाने घेतली नव्हती.
या पार्श्वभूमीवर, सोमवारी अमेरिकेने आपल्या मित्र व सहकारी देशांसह चीनविरोधात घेतलेली ठाम भूमिका लक्ष वेधून घेणारी ठरते. युरोपिय महासंघाने यापूर्वीच्या काळात चीनच्या सायबरहल्ल्यांविरोधात फारशी आक्रमक भूमिका स्वीकारलेली नव्हती. त्यामुळे अमेरिकेने पुढाकार घेतल्यानंतर त्यात युरोपिय महासंघाने दिलेला सहभागही महत्त्वाचा ठरतो.
चीनने आपल्यावरील हे गंभीर आरोप नाकारले आहेत. मात्र कोरोना, साऊथ चायना सी, उघुरवंशिय व मानवाधिकारांपाठोपाठ सायबरहल्ल्यांच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने उघडलेली ही आघाडी चीनसाठी नवे आव्हान ठरू शकते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |