मॉस्को – युक्रेन हा नाटोच्या रशियाविरोधी कारवायांसाठी नवा तळ बनणार नाही याची हमी द्या, अन्यथा मोठ्या संघर्षाचा धोका पत्करा, असा खरमरीत इशारा रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिबकोव्ह यांनी दिला. रशियाचे प्रतिस्पर्धी देश ही गोष्ट ऐकतील, अशी आशा आहे असेही रिबकोव्ह पुढे म्हणाले. मात्र अमेरिकेसह नाटोने रशियाची ही मागणी मान्य करण्याचे नाकारले आहे. अमेरिका व ब्रिटनसह ‘जी७’ देशांनी, युक्रेनवरील आक्रमण ही रशियाची घोडचूक ठरु शकते, याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे. तर युक्रेनच्या नाटोतील सहभागाचा निर्णय ३० सदस्य देश घेतील व इतर कुणीही त्यात ढवळाढवळ करू शकणार नाही, असे नाटोच्या प्रमुखांनी सुनावले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमणाची जय्यत तयारी केल्याच्या बातम्या व दावे गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. दावे करणारी माध्यमे तसेच यंत्रणांनी त्यासोबत रशियाच्या लष्करी हालचालींची माहिती देणारे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केल्याने या भागातील तणाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी २०१४ सालीही रशियाने अशाच प्रकारे सैन्यतैनाती वाढवून अचानक हल्ला चढविला होता, याची आठवणही करून देण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर रशिया व पाश्चात्य देशांमध्ये शाब्दिक चकमकी उडण्यास सुरुवात झाली असून राजनैतिक घडामोडींनाही वेग आला आहे. युक्रेवरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात चर्चा पार पडली होती. या चर्चेत पुतिन यांनी स्पष्ट शब्दात नाटोने रशियाच्या दिशेने सुरू असलेली विस्ताराची प्रक्रिया (ईस्टवर्ड एक्सपान्शन) थांबवावे, अशी मागणी केली होती. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी त्यावर कोणतेही ठोस आश्वासन दिले नव्हते. मात्र त्यानंतर युक्रेन व पूर्व युरोपिय देशांबरोबर झालेल्या बैठकांमध्ये अमेरिकेने संबंधित देशांमध्ये संरक्षणतैनाती व सहकार्य वाढविण्याची ग्वाही दिली होती.
आपल्या मागणीकडे अमेरिकेने दुर्लक्ष केल्याने रशियात नाराजी असून रशियाने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत दिले आहेत. उपपरराष्ट्रमंत्री रिबकोव्ह यांनी दिलेला इशारा त्याचाच भाग ठरतो. ‘रशियाचे प्रतिस्पर्धी देश असणार्या अमेरिका व समविचारी देशांनी आमचा प्रस्ताव नाकारला अथवा उधळण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या सुरक्षेला धोका उत्पन्न होऊ शकतो. रशियाच्या प्रस्तावाला मान्यता न देणे याचा अर्थ, मोठ्या संघर्षाचा भडका उडण्याचा धोका हा असेल’, असे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिबकोव्ह यांनी बजावले. अमेरिका व नाटोकडून पूर्व युरोपात वाढविण्यात येणार्या संरक्षणक्षमतांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. या वाढत्या तैनातीतून युरोपात नवा ‘मिसाईल क्रायसिस’ तयार होऊ शकतो, याकडे रशियन मंत्र्यांनी लक्ष वेधले.
मात्र रशियाच्या इशार्यांवर पाश्चात्य देशांसह नाटोने प्रत्युत्तर दिले आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या ‘जी७’च्या बैठकीत, युक्रेनवरील आक्रमण रशियाची धोरणात्मक घोडचूक ठरेल व त्याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतील, याची जाणीव करून देण्यात आली. युक्रेनच्या मुद्यावर पाश्चात्य देश रशियाला एकजुटीने तोंड देतील, अशी ग्वाहीदेखील देण्यात आली. नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनीही, नाटोच्या विस्ताराबाबत रशियाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे बजावले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |