पाश्चिमात्य देशांच्या शस्त्रपुरवठ्यामुळे युक्रेनमधील अस्थैर्य वाढेल

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा इशारा

युक्रेनमधील अस्थैर्य

मॉस्को/किव्ह – पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला करण्यात येणारा शस्त्रपुरवठा धोकादायक असून यामुळे युक्रेनमधील अस्थैर्यात अधिकच भर पडेल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला आहे. फ्रान्स व जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या संभाषणादरम्यान पुतिन यांनी हा इशारा दिला. पुतिन यांच्यापाठोपाठ रशियाच्या अमेरिकेतील राजदूतांनीही युक्रेनला करण्यात येणाऱ्या शस्त्रपुरवठ्यावर टीकास्त्र सोडले असून जागतिक सुरक्षेवर त्याचे परिणाम होतील, असे बजावले आहे.

फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा सुरू केला होता. सध्या अमेरिका व युरोपिय देशांसह जवळपास 27 देश युक्रेनला शस्त्रपुरवठा करीत असल्याचे मानले जाते. अमेरिका यात आघाडीवर असून गेल्या चार महिन्यात अमेरिकेने युक्रेनला जवळपास चार अब्ज डॉलर्स किमतीची शस्त्रे पुरविली आहेत. यात रायफल्स, रॉकेट्स, तोफा, रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे, रडार यांचा समावेश आहे. युक्रेनला अविरत शस्त्रपुरवठा सुरू ठेवण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत विधेयकही मंजूर करण्यात आले आहे.

युक्रेनमधील अस्थैर्य

युक्रेनला होणाऱ्या या शस्त्रपुरवठ्याविरोधात रशियाने सातत्याने इशारे दिले आहेत. युक्रेनमध्ये आलेल्या परदेशी शस्त्रसाठ्यांवर रशियाकडून हल्लेही चढविण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही पाश्चिमात्य देशांनी युक्रेनचा शस्त्रपुरवठा अधिक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया-युक्रेन युद्धात रशिया जिंकता कामा नये, अशा शब्दात युद्ध जितका काळ सुरू राहिल तितका काळ शस्त्रपुरवठा करण्याचे संकेत पाश्चिमात्यांनी दिले आहेत.

युक्रेनमधील अस्थैर्य

या पार्श्वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युरोपिय नेत्यांबरोबरील संभाषणात त्यावर आक्रमक भूमिका घेणे लक्ष वेधून घेणारे ठरते. यापूर्वी रशिया व युरोपिय नेत्यांमध्ये झालेल्या चर्चा युद्ध थांबविणे तसेच नागरिकांची सुटका यासंदर्भातील मुद्यांवर झाल्या होत्या. मात्र पुतिन यांनी शस्त्रपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित करून युद्ध लांबविण्यासाठी पाश्चिमात्य देशच जबाबदार असल्याचा उघड ठपका ठेवला आहे.

दरम्यान, अमेरिका युक्रेनला प्रगत ‘आर्टिलरी सिस्टिम’ तसेच रॉकेट यंत्रणा देणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्तावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. रशियाचे अमेरिकेतील राजदूत ॲनातोली ॲन्तानोव्ह यांनी, अमेरिकेच्या निर्णयामुळे रशिया-युक्रेन युद्धाचा भडका अधिकच तीव्र होईल, असे बजावले आहे. अमेरिकेच्या संभाव्य शस्त्रपुरवठ्यामुळे युक्रेनमधील शांतता धोक्यात येईल व जागतिक सुरक्षेवरही त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा ॲन्तानोव्ह यांनी दिला.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info