रशियन इंधनाच्या खरेदीवरील निर्बंधांवर महासंघाचे एकमत

- वर्षाच्या अखेरपर्यंत रशियन इंधनाच्या खरेदीत 90 टक्क्याची कपात करणार

ब्रुसेल्स/किव्ह – या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या इंधनात 90 टक्क्यांची कपात करण्याची घोषणा युरोपिय महासंघाने केली. यावर महासंघाच्या बैठकीत एकमत झाल्याचे दावे करण्यात येत आहे. पण रशियन इंधनाच्या खरेदीवर निर्बंध टाकण्यास कडाडून विरोध करणाऱ्या हंगेरी आणि बेलारूस या देशांना वगळून महासंघाची ही बैठक पार पडली. त्यामुळे या एकमताच्या दाव्याला फारसा अर्थ नसल्याचे उघड होत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी यासाठी युरोपिय महासंघावर सडकून टीका केली आहे.

90 टक्क्याची कपात

युरोपिय देश रशियाच्या इंधनावर अवलंबून आहेत. युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर युरोपिय देशांनी रशियाकडून इंधनाची खरेदी थांबवावी, अशी मागणी अमेरिका व ब्रिटन या देशांनी केली होती. मात्र युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळातही अमेरिका रशियाकडून इंधनाची खरेदी करीत असल्याची बाब उघडझाली होती. काही युरोपिय देशांनी युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाला विरोध केला असला, तरी एकाएकी रशियाकडून इंधनाची आयात थांबविणे शक्य नसल्याचे म्हटले होते.

युक्रेनला रशियाच्या हल्ल्यापासून वाचवायचे असेल, तर मग आधी इंधनाची खरेदी करून रशियाची तिजोरी भरण्याचे थांबवा, अशी मागणी रशियाच्या विरोधात असलेल्या पोलंड तसेच इतर काही युरोपिय देशांनी केली होती. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष देखील या मुद्यावर युरोपिय देशांवर घणाघाती टीका करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, युरोपिय महासंघाच्या बैठकीत या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या इंधनात 90 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णयघेण्यात आला.

90 टक्क्याची कपात

महासंघाच्या आधीच्या बैठकीत रशियन इंधनाच्या खरेदीवर निर्बंध टाकण्याचे प्रस्ताव हंगेरी आणि बेलारूस या देशांनी हाणून पाडले हेोते. म्हणूनच यावेळच्या बैठकीत या दोन्ही देशांना वगळण्यात आले. त्यानंतर महासंघाची रशियन इंधनाच्या खरेदीवर निर्बंध लादण्यावर सहमती झाल्याची घोषणा करण्यात आली. तसेच महासंघाच्या निर्णयाविरोधात जाऊन रशियाकडून इंधनाची खरेदी करणाऱ्या हंगेरी व बेलारूसला या इंधनाच्या पुरवठ्यासाठी मार्ग खुला करायचा नाही, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

महासंघाने असे निर्णयघेतले असले तरी त्याने युक्रेनचे समाधान झालेले नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पूर्ण एकमताने रशियन इंधनाच्या खरेदीवर पूर्णपणे बंदी टाकण्याचा निर्णय घेण्यात महासंघाला अपयश आले, अशी टीका केली आहे. तर हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी आपल्या देशाची जनता शांतपणे झोप घेऊ शकते, असे खोचक उद्गार काढून महासंघाच्या या निर्णयावर टीका केली आहे.

English    मराठी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info