मॉस्को/किव्ह – रशियाकडून डोन्बासमध्ये सुरू असलेल्या आक्रमक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनला प्रगत हवाईसुरक्षा यंत्रणा पुरविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सातत्याने याची मागणी केली होती. या आठवड्यात अमेरिका युक्रेनला देण्यात येणाऱ्या हवाईसुरक्षा यंत्रणेची घोषणा करेल, असा दावा सूत्रांनी केला आहे. दरम्यान, रशियाविरोधातील युद्ध या वर्षअखेरपर्यंतच संपायला हवे, असे वक्तव्य राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ‘जी7′ देशांबरोबर झालेल्या बैठकीत व्यक्त केल्याचे वृत्त समोर आले आहे.
फेब्रुवारी महिन्यात युक्रेनमध्ये लष्करी मोहीम सुरू करणाऱ्या रशियाला मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात मोठे सामरिक यश मिळत असल्याचे उघड होत आहे. रशियाच्या या यशामुळे युक्रेनसह पाश्चिमात्य देशही अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे रशियाला मागे ढकलण्यासाठी युक्रेनकडून हालचालींना वेग आला आहे. यात प्रामुख्याने पाश्चिमात्यांकडून मिळणाऱ्या शस्त्रसहाय्याचे प्रमाण व वेग वाढविणे यावर भर देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच युक्रेनला अमेरिकेकडून ‘हार्पून’ ही क्षेपणास्त्र यंत्रणा तसेच ‘हायमार्स’ ही रॉकेट यंत्रणा मिळाली असून त्याचा वापरही सुरू झाल्याचे सांगण्यात येते.
मात्र या यंत्रणांबरोबरच युक्रेन सातत्याने प्रगत हवाईसुरक्षा यंत्रणांची मागणी करीत आहे. युक्रेनकडे सध्या असलेल्या हवाईसुरक्षा यंत्रणा बहुतांश रशियन बनावटीच्या व जुन्या आहेत. त्यातील अनेक यंत्रणा रशियन हल्ल्यात निकामी झाल्याने रशियाच्या नव्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे युक्रेनसाठी अवघड ठरत आहे. त्यात गेल्या महिन्याभरात युक्रेनला डोन्बास क्षेत्रातील अनेक महत्त्वाची शहरे गमवावी लागली आहेत. पुढील काही आठवडे रशियन आक्रमणाची तीव्रता कायम राहिली तर संपूर्ण डोन्बास क्षेत्र रशियाच्या नियंत्रणाखाली जाण्याची भीती आहे. असे झाल्यास युक्रेनी लष्कराबरोबरच समर्थक पाश्चिमात्य देशांनाही तो मोठा धक्का ठरु शकतो. त्यामुळे रशियाला पिछाडीवर टाकण्यासाठी युक्रेन प्रयत्न करीत असून त्याला ‘जी7′ गटाने प्रतिसाद दिल्याचे समोर येत आहे. ‘जी7’मधील आघाडीचा देश असणाऱ्या अमेरिकेने युक्रेनला प्रगत ‘नॅसॅम्स’ यंत्रणा पुरविण्याचे संकेत दिले आहेत. नॉर्वे व अमेरिकेची आघाडीची कंपनी रेथॉन यांनी ही हवाईसुरक्षा यंत्रणा विकसित केली होती. 2019 साली याची प्रगत आवृत्ती विकसित करण्यात आली असून त्याचा पल्ला 30 किलोमीटर्सहून अधिक आहे. रशियन विमाने व क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल, असे मानले जाते.
दरम्यान, जी7 गटाने युक्रेनबाबत संयुक्त निवेदन जारी केले आहे. त्यात युक्रेनला दीर्घकाळपर्यंत आर्थिक, मानवतावादी, लष्करी व राजनैतिक सहाय्य पुरविण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |